सलमान खान याच्या इमारतीत सापडल्या डेंग्यूच्या अळ्या; महापालिकेची औषध फवारणी

डेंग्यू झाल्यानंतर सलमान खान काही दिवसांपूर्वी आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसून आला होता. सलमानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

सलमान खान याच्या इमारतीत सापडल्या डेंग्यूच्या अळ्या; महापालिकेची औषध फवारणी
Salman Khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2022 | 11:17 AM

मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (salman khan) गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. महापालिका प्रशासनाने (bmc) पाहणी केली असता सलमानच्या इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूचा लार्वा (dengue) सापडला. त्यामुळे महापालिकेने या इमारतीत फवारणी सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेची पाहणी सुरू असताना अभिनेता सलमान खान घरी नव्हता, असं पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं.

सलमान खानला काही दिवसांपूर्वीच डेंग्यूची लागण झाली होती. सलमानला डेंग्यूची लागण झाल्याने त्याच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमाचं चित्रिकरणही थांबवण्यात आलं होतं. प्रकृती ठिक नसल्याने सलमानने बिग बॉसचं विकेंडमधील सूत्रसंचालनही केलं नव्हतं. त्याच्या जागी करण जोहरने या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र, आता सलमानची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जात आहे.

सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेने सलमानच्या इमारतीत येऊन औषधांची फवारणी केली. तसेच धूर फवारणीही केली. तसेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आसपासच्या परिसरातही औषध फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, गॅलेक्सी अपार्टमेंटची पाहणी करण्यात आली असता या इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, डेंग्यू झाल्यानंतर सलमान खान काही दिवसांपूर्वी आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसून आला होता. सलमानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आज किंवा उद्यापासून सलमान पुन्हा एकदा चित्रिकरणात व्यस्त असेल असं सूत्रांनी सांगितलं. डेंग्यूची लागण झाल्याने सलमानने दिवाळीच्या पार्टीत भाग घेतला नव्हता. सलमान बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.