Flipkart: फ्लिपकार्टवर सुशांतचा असा अपमान पाहून भडकले चाहते; कंपनीवर बहिष्कार टाकण्याची करत आहेत मागणी

मंगळवारी एका चाहत्याने सुशांतचा फोटो आणि डिप्रेशनबद्दलचा (Depression) संदेश लिहिलेल्या या टी-शर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर 'बॉयकॉट फ्लिपकार्ट' हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला.

Flipkart: फ्लिपकार्टवर सुशांतचा असा अपमान पाहून भडकले चाहते; कंपनीवर बहिष्कार टाकण्याची करत आहेत मागणी
Flipkart: फ्लिपकार्टवर सुशांतचा असा अपमान पाहून भडकले चाहते
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 4:38 PM

ई-कॉमर्स वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’ने (Flipkart) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फोटो असलेला टी-शर्ट विकण्यास सुरुवात केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये टी-शर्टवर ‘डिप्रेशन हे बुडण्यासारखं आहे’ असा संदेश आहे. मंगळवारी एका चाहत्याने सुशांतचा फोटो आणि डिप्रेशनबद्दलचा (Depression) संदेश लिहिलेल्या या टी-शर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ‘बॉयकॉट फ्लिपकार्ट’ हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. सुशांतच्या चाहत्यांनी फ्लिपकार्टवर ‘अत्यंत वाईट मार्केटिंग’ची टीका केली आहे. 2020 मध्ये मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. मृत्यूपूर्वी तो नैराश्यात असल्याचं म्हटलं गेलं होतं.

टी-शर्टवरील संदेश हा सुशांतचा मृत्यू आत्महत्येनं झाल्याचं सूचित करत असल्याने चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी फ्लिपकार्टने माफी मागावी आणि त्यांच्या वेबसाइटवरून तो टी-शर्ट काढून टाकावा अशी मागणी केली. ट्विटरवर झालेल्या या तीव्र विरोधानंतर सध्या ई कॉमर्स वेबसाइटवर तो टी-शर्ट दिसत नाही. सुशांतच्या चाहत्यांनी फ्लिपकार्टच्या टी-शर्टचे स्क्रीनशॉट्स ट्विट केले आहेत. हे असंवेदनशील असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

एका चाहत्याने लिहिलं, “सुशांतच्या दुःखद मृत्यूच्या धक्क्यातून देश अजून सावरलेला नाही. न्यायासाठी आम्ही आवाज उठवत राहू. फ्लिपकार्टला या घृणास्पद कृत्याची लाज वाटली पाहिजे आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी माफी मागितली पाहिजे.” “आता हा काय मूर्खपणा आहे फ्लिपकार्ट? सुशांतच्या फोटोला डिप्रेशनचा असा लेबल लावणं म्हणजे ही अत्यंत खालच्या दर्जाची मार्केटिंग आहे,” असं दुसऱ्या युजरने लिहिलं. काहींनी याकडेही लक्ष वेधलं की सीबीआयने (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अद्याप सुशांतच्या मृत्यूबद्दलचा अहवाल जाहीर केला नाही. एका नेटकऱ्याने फ्लिपकार्टविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी प्राथमिक अहवालात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपवण्यात आलं.