Big News : ईडीचा धक्कादायक गौप्यस्फोट, जॅकलीन फर्नांडिस देश सोडून पळून जाणार होती; आणखी खुलासे काय?

जॅकलीन प्रकरणावर आता 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी वकील प्रशांत पाटील यांनी जॅकलीनची बाजू मांडली.

Big News : ईडीचा धक्कादायक गौप्यस्फोट, जॅकलीन फर्नांडिस देश सोडून पळून जाणार होती; आणखी खुलासे काय?
जॅकलीन फर्नांडिस देश सोडून पळून जाणार होती; आणखी खुलासे काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2022 | 6:36 PM

नवी दिल्ली: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जॅकलीनला आज कोर्टात हजर करण्यात आल होते. जॅकलीनच्या अंतरीम जामिनात 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, ईडीने (ED) तिच्या जामिनाला विरोध केला आहे. 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) जॅकलीन हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असं ईडीने कोर्टाला सांगितलं. तसेच ती देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती, असा गौप्यस्फोटही ईडीने कोर्टात केला आहे.

ईडीने आज कोर्टात एकामागून एक गौप्यस्फोट करत जॅकलीनच्या अडचणीत वाढ केली आहे. जॅकलीनने चौकशी दरम्यान पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होती. तिने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तसेच चौकशी सुरू असतानाच ती देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, एलओसी जारी करण्यात आल्याने त्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. जॅकलीनची जेव्हा जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा तेव्हा तिने तपास कामात सहकार्य केलं नाही, असं ईडीने म्हटलं आहे.

चौकशीवेळी जॅकलीनची वागणूक बरोबर नव्हती. ती पुरावे नष्ट करू शकते. साक्षीदारांना त्रास देऊ शकते, असं ईडीने कोर्टात सांगितलं. ईडीने पटियाला हाऊस कोर्टात हा युक्तिवाद करतानाच जॅकलीनच्या जामिनाला विरोध केला आहे.

दुसरीकडे महाठग सुकेश चंद्रशेखर याने त्याच्या वकिलाला पत्रं लिहिलं आहे. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलीनचा काहीच संबंध नसल्याचं त्याने या पत्रात म्हटलं आहे. आमच्यातील नात्यामुळेच मी तिला पैसे आणि गिफ्ट दिले. रैनबेक्सीच्या आधीच्या मालकाची बाजू घेण्यासाठी मला 200 कोटी रुपये मिळाले होते. इंडोनेशियात आपली कोळशाची खाण आहे. हॉटेल आणि न्यूज चॅनलचे स्टेक आहेत. ते आपण विकले आहेत, असंही त्याने या पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, जॅकलीन प्रकरणावर आता 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी वकील प्रशांत पाटील यांनी जॅकलीनची बाजू मांडली. यावेळी कोर्टाने ईडीला सर्व पक्षकारांना चार्जशीट आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्याचे आदेश दिले.