Sridevi: पती, पत्नी और वो… म्हणून बोनी कपूर थेट इटलीला निघून गेले

श्रीदेवी इटलीमध्ये असताना असं नेमकं काय घडलं होतं? जान्हवीने सांगितला किस्सा

Sridevi: पती, पत्नी और वो... म्हणून बोनी कपूर थेट इटलीला निघून गेले
Sridevi and Boney Kapoor
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 17, 2022 | 9:27 AM

मुंबई: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वडील बोनी कपूर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलीच्या प्रमोशनसाठी काही कार्यक्रमांमध्ये जान्हवी आणि बोनी यांनी एकत्र हजेरी लावली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांचा एक जुना किस्सा सांगितला. श्रीदेवी यांच्यासाठी एके दिवशी बोनी कपूर मुंबईहून थेट इटलीला गेले होते. तडकाफडकी मुंबईहून इटलीला जाण्यामागचं कारणही तसंच होतं.

श्रीदेवी या एकदा इटलीला फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी बोनी कपूर हे दोन्ही मुलींसोबत मुंबईतच होते. इटलीच अचानक एक व्यक्ती श्रीदेवी यांच्या फ्लर्ट करू लागला. हे कळताच बोनी कपूर हे तडकाफडकी इटलीला निघून गेले.

“आमच्या घरातील फर्निचर खरेदी करण्यासाठी आई इटलीला गेली होती. तिथे एक इटालियन व्यक्ती त्यांच्याशी फ्लर्ट करू लागला. आई तिच्या मैत्रिणींसोबत तिथे गेली होती. या घटनेने ती आश्चर्यचकीत झाली होती. ‘तो माझ्याशी असं कसं बोलू शकतो’, असं आई तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. हाच किस्सा त्या मैत्रिणीने वडिलांना मस्करीत सांगितला. तेव्हा रागाच्या भरात त्यांनी मला आणि खुशीला इथे मुंबईतच सोडलं आणि इटलीला गेले”, असं जान्हवीने सांगितलं.

आपल्या पत्नीशी कोणीतरी फ्लर्ट करतंय हे कळताच बोनी कपूर इटलीला गेले. मात्र याच कारणामुळे त्यांना इटलीत पत्नीसोबत थोडा वेळ व्यतीत करण्यास मिळाला, असंही ती म्हणाली.

जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. जान्हवीचा ‘बवाल’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.