‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील या प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? काळजात धडकी भरवणारा लूक!
महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटातील एका नव्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेता ही आगळीवेगळी भूमिका साकारत असून त्याचा हा फर्स्ट लूक चर्चेत आला आहे. हा अभिनेता कोण आहे, ते ओळखा..

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे. हा लूक त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा एकदम वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची आणि सोबतीला चित्रपटाबद्दलचीही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणाला, “‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रूरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल.”
View this post on Instagram
हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. याशिवाय विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचं संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
