‘आयुष्यात काही माणसं आपापले रंग दाखवतात..’; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळीनिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. इन्स्टाग्रामवर कुशल मोकळेपणे त्याचे विचारसुद्धा मांडतो. अशीच एक पोस्ट त्याने होळीनिमित्त लिहिली आहे. कुशलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे सेल्फी पोस्ट केले आहेत. या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये त्याने होळीनिमित्त विशेष पोस्ट लिहिली आहे. ‘आयुष्यात आलेली काही मागणं, त्यांची वेळ आली की आपआपले रंग दाखवतात आणि निघून जातात’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. कुशलच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.
कुशल बद्रिकेची पोस्ट-
‘आयुष्यात आलेली काही माणसं, त्यांची वेळ आली की आपआपले रंग दाखवतात आणि निघून जातात. असल्या अनुभवांनी आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पण या दोन्ही प्रकारच्या रंगांनी होळी (धुळवड) खेळता येत नाही आणि ज्या रंगानी ती खेळता येते त्यातले बरेचसे रंग कोणत्या ना कोणत्या तरी समाजाने वाटून घेतले आहेत. नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाने वाटून घेतले आहेत’, असं त्याने लिहिलंय.




या पोस्टमध्ये पुढे त्याने म्हटलंय, ‘या होळीत जर चुकून माझ्याकडून असा एखादा रंग उधळला गेलाच तर तो होळीचाच होता, हे मी आताच जाहीर करतो. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू माझ्या अंतरंगात नाही.’ कुशलने तळटीपमध्ये लिहिलं, ‘यादिवशी पाण्याने होळी खेळणाऱ्याची तर बिनपाण्याने केली जाते :- सुकून.’
View this post on Instagram
कुशलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा कुशल नामक अवलिया शब्दरंग उधळण्याचं कौशल्य दाखवतो त्याक्षणीच आम्ही प्रेमरंगात रंगतो,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘मराठी भाषेचे किती रंग तुम्ही दाखवता राव’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘लेखनातून उधळला जाणारा रंग पण आहे सर आपल्याकडे,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कुशलच्या लेखनकौशल्याचं कौतुक केलंय.
कुशलने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाशिवाय ‘जत्रा’, ‘पांडू’, ‘डावपेच’, ‘रंपाट’, ‘भिरकिट’, ‘बापमाणूस’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो झळकला आहे.