
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा 2025 या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. 14 फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा थिएटरमध्ये तिसरा आठवडा सुरू आहे. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. विकीने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील बारकाव्यांचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. अशातच विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरील एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. दररोज ‘छावा’च्या शूटिंगची सुरुवात शिवगर्जनेनं होत असल्याचं विकीने सांगितलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही ऊर अभिमानानं भरून येईल.
‘छावाबद्दल मला भाग्यवान वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे चित्रपट बनवण्याच्या सर्वांत प्रामाणिक प्रक्रियांपैकी ही एक प्रक्रिया आहे. ज्याचा भाग होण्याची संधी मला मिळाली. त्या शुद्धतेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दररोजचा विधी.. प्रत्येक दिवसाची शूटिंग शिवगर्जनेनं सुरू करणं आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आशीर्वाद घेणं. हे आमचा सर्वांत प्रिय कला सहाय्यक बाळा पाटीलने केलं. धन्यवाद बाळा’, असं त्याने लिहिलंय.
विकीच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता,’ असं एकाने लिहिलं. तर ‘या भूमिकेसाठी तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘छत्रपती संभाजी महाराज यांना एका कट्टर मावळाकडून मानाचा मुजरा,’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईट 65.38 टक्क्यांची वाढ झाली. शनिवारी या चित्रपटाने 21.75 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत ‘छावा’ची भारतात एकूण कमाई 434.25 कोटी रुपये झाली आहे. तर जगभरात कमाईचा आकडा हा 566.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. तर दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.