Dipika Chikhlia : सीता पहिली सिंगल मदर, ती कमी बोलायची म्हणून…दीपिका चिखलिया यांचं वक्तव्य चर्चेत
Dipika Chikhlia : 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी सीतेच्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य केलं आहे.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीता मातेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सीतेच्या व्यक्तिरेखेबद्दल आपलं परखड मत मांडलं. सीता ही केवळ त्यागाची मूर्ती नव्हती, तर ती एक खंबीर आणि स्वतंत्र विचारांची स्त्री होती, असं मत त्यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे, सीता ही पहिली ‘सिंगल मदर’ होती, असंही त्या म्हणाल्या आहेत. सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या रामायण मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांचीही पुन्हा चर्चा होत आहे.
‘She The People’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका चिखलिया यांनी सीतेच्या स्वभावाबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, सीता ही एक आदर्श महिला होती. ती कमी बोलायची म्हणून ती कमजोर होती, असा अर्थ होत नाही. शांत राहणं किंवा जास्त न बोलणं म्हणजे एखादी व्यक्ती कमकुवत आहे, असं अजिबात नाही. सीतेनं अनेक प्रसंगी आपली मतं ठामपणे मांडली होती. प्रभू राम यांच्यासोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिचे वडील राजा जनक आणि सासरे राजा दशरथ यांनी तिला माहेरी परत जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सीता आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिनं रामांसोबत १४ वर्षांचा वनवास स्वीकारला. विशेष म्हणजे, तिनं या निर्णयाला त्यागाचं नावही दिलं नाही, कारण तो तिचा स्वतःचा निर्णय होता, असं दीपिका यांनी सांगितलं.
‘सीता ही पहिली सिंगल मदर होती!’
सीतेच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना दीपिका चिखलिया म्हणाल्या, ‘सीता ही पहिली सिंगल मदर होती. त्यामुळेच मला वाटतं की ती एक खंबीर महिला होती. आजच्या काळातही तिची व्यक्तिरेखा तितकीच प्रासंगिक आहे. सीता प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची, मात्र काही वेळा स्वतःसाठी आवाज उठवणं आणि आपलं म्हणणं मांडणंही गरजेचं असतं.’
रामायणातील सीतेची अग्निपरीक्षा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांवरही दीपिका यांनी आपलं मत मांडलं. त्यांच्या मते, सीतेनं योग्य वेळी प्रभू राम यांच्याशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली असती, तर कदाचित पुढील परिस्थिती उद्भवली नसती. त्या म्हणाल्या की, एका टप्प्यावर सीतेनं रामांना स्पष्टपणे सांगितलं की, आता ती त्यांच्यासोबत राहू शकत नाही. त्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि आपल्याला धरती माता सामावून घेईल. मात्र, हा टप्पा येण्यापूर्वीच सीतेनं रामांना प्रश्न विचारायला हवा होता. दोघांमध्ये योग्य संवाद झाला असता, तर कदाचित गोष्टी इतक्या पुढे गेल्याच नसत्या, असं दीपिका यांना वाटतं.
