‘देवमाणूस’ टीमचा ‘नवरी नटली’ गाण्यावर भन्नाट डान्स; किरण गायकवाडने वेधलं सर्वांचं लक्ष
मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाळ आणि लालीचा सुखाचा संसार सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्याला या मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका आहे. रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळचं लग्न आहे. यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत, जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत. एकीकडे मालिकेत चित्तथरारक गोष्टी घडत असतानाच ऑफस्क्रीन मात्र कलाकारांची धमाल मजा सुरू आहे. लाली आणि गोपाळच्या हळदीच्या सीनदरम्यान सर्व टीमने मिळून ‘नवरी नटली’ या गाण्यावर डान्स केला.
एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.
View this post on Instagram
सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीनबद्दल सांगितलं, “आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम,हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकंच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बँड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बँड आणि अशीच गाणी वाजवली जातात. पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ -लालीचं लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लूकमध्ये तयार केलं जातंय. मला मालिकेतली लग्न फार आवडतात.”
“तब्बल आठ ते दहा दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येतेय. त्यातच आम्ही एक लग्नाचा रील व्हिडीओ शूट केला आहे. ‘नवरी नटली’ या गाण्यावर आम्ही सर्वजण नाचलो. हा व्हिडीओ शूट करण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागली. कारण सर्वांचं एकत्र येणं खूप कठीण होतं. पूर्ण दिवस निघून गेल्यावर मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली. जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला आणि त्याने दिग्दर्शकांना विनंती केली की आम्हाला ती रील शूट करायची आहे. सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि तो व्हिडीओ शूट करताना पाहून तेसुद्धा खूप हसत होते”, असा अनुभव सोनमने सांगितला.
