Dhadak 2 OTT Release : प्रेम, जातिभेद अन् बरंच काही; ‘धडक 2’ला ओटीटीवर मिळेल का न्याय?
तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'धडक 2' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची अपडेट समोर आली आहे. ओटीटीवर हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार, ते जाणून घ्या..

1 ऑगस्ट 2025 रोजी दोन हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यापैकी एक अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार 2’ होता. तर दुसरा चित्रपट अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘धडक 2’ होता. या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. अशातच ‘धडक 2’च्या ओटीटी रिलीजविषयीची माहिती समोर आली आहे.
तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘धडक 2’ हा ‘परियेरुम पेरुमल’ (2018) या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्याचप्रमाणे 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचा हा स्पिरिच्युअल सीक्वेल असल्याचंही म्हटलं जात आहे. जान्हवी आणि ईशानचा ‘धडक’ हा चित्रपट नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’चा हिंदी रिमेक होता. मूळ चित्रपट रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
‘धडक 2’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने ‘धडक 2’च्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क विकत घेतले आहेत. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांच्या कालावधीत ओटीटीवर स्ट्रीम होतो. त्या हिशोबाने ‘धडक 2’ या चित्रपटाचं प्रीमिअर नेटफ्लिक्सवर 12 ते 26 सप्टेंबरदरम्यान होऊ शकतो. परंतु अद्याप या चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सच्या टीमकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
View this post on Instagram
‘धडक 2’ या चित्रपटात एका कॉलेजमधल्या तरुण-तरुणीची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. यात जातीभेदाचाही मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये सिद्धांतने कायद्याच्या विद्यार्थ्याची (नीलेश अहिरवार) भूमिका साकारली आहे. वर्गातील विधी भारद्वाज नावाच्या तरुणीवर तो प्रेम करतो लागतो. या तरुणीची भूमिका तृप्तीने साकारली आहे. नीलेश आणि विधी एकमेकांवर प्रेम करू लागतात. परंतु त्यांचं हे प्रेम त्यांच्या कुटुंबीयांना मंजूर नसतं. यामुळे दोघांना त्यांच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘सैयारा’, ‘महावतार नरसिम्हा’, ‘सन ऑफ सरदार 2’ यांसारख्या चित्रपटांसोबत टक्कर असल्याने ‘धडक 2’ला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीये. या चित्रपटाने सहा दिवसांत फक्त 15.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
