थलपती विजयला मोठी टक्कर? सुपरस्टार अभिनेता करणार राजकारणात एन्ट्री; तामिळनाडूत मोठा उलटफेर?
थलपती विजय यांच्या राजकीय यशानंतर इतर अभिनेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. आता सुपरस्टार धनुष लवकरच राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धनुषची फॅन असोसिएशन सक्रिय झाल्याने ही शक्यता बळावली आहे. धनुषच्या प्रवेशाने मुख्यमंत्री विजय यांना मोठी टक्कर मिळण्याची शक्यता असून, तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकारणात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत अभिनेता थलपती विजय थेट मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे सर्वच अभिनेत्यांच्या राजकीय आकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत. सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांना जे जमलं नाही ते थलपती विजयने करून दाखवलं. म्हणजे तामिळनाडूची जनता कलाकारांना स्वीकारते. फक्त त्यांच्या समोर प्रमुख मुद्दे घेऊन गेलं पाहिजे, ही बाब लक्षात आल्यानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या कलाकरांची पावलं आता राजकारणाकडे वळू लागली आहेत. सध्या तरी अभिनेता धनुष लवकरच राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
धनुष राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. मुख्यमंत्री विजय यांचा टीव्हीके पक्षही या घटनेवर लक्ष ठेवून आहे. टीव्हीकेने धनुष यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री विजय यांचा सिनेमा ते मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे आणखी कुणी राजकारणात येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, असं टीव्हीकेचे प्रमुख प्रवक्ते एम. सत्य कुमार यांनी म्हटलं आहे.
टीव्हीके पक्ष हा एक पॉलिटिकल स्टार्टअप आहे. याचा आम्हाला आनंद आहे. लोकांसाठी हा पक्ष प्रेरणा बनत आहे. विजय यांनी यासाठी 30 वर्ष काम केलंय. हे काही सोपं काम नाहीये. राजकारणात नवे पर्याय समोर येऊ शकतात, पण ते किती काळ टिकतात आणि त्यांच्यात किती ताकद असेल हे पाहावं लागणार आहे, असं सत्य कुमार म्हणाले.
राजकारणासाठी फुल वेळ हवा
विजय यांची पद्धत ही भविष्यात राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मॉडल म्हणून काम करू शकते. राजकारणात सहजपणे एन्ट्री घेतल्या जाऊ शकते. पण त्यासाठी टिकणं महत्त्वाचं आहे. शिवाय राजकारण हे अर्धवेळ किंवा वेळ मिळेल तेव्हा करायची गोष्ट नाहीये. राजकारणात फुलटाईम कमिटमेंट हवी, असंही त्यांनी सांगितलं.
धनुषची का होतेय चर्चा?
कोईम्बतूरमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत धनुष यांच्या फॅन असोसिएशनने असोसिएशनचं नाव बदलून धनुष नरपानी इयक्कम (धनुष कल्याण आंदोलन) असं ठेवलं. त्यानंतर धनुष हे राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. ही चर्चा अधिकच वेगाने होत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला 3 हजाराहून अधिक पदाधिकारी जमले होते. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आल्याने चर्चांचं माहोळ उठलं आहे. धनुष हे राजकारणात येतील की नाही हे सांगता येत नाही. त्याबाबत अजून कोणी अधिकृतपणे काही सांगितलेलं नाही. पण धनुषच्या राजकारणात येण्याच्या चर्चांनी तर तामिळनाडूच्या राजकारणात धुरळा उडवून दिला आहे. आणि खरोखरच जर धनुष राजकारणात आला तर विजय यांना ही एक मोठी टक्कर असणार आहे. तसेच तामिळनाडूच्या राजकारणात या निमित्ताने मोठा उलटफेर होण्याची शक्यताही आहे.
