धर्मेंद्रजींनी नेहमी मला मुलासारखी वागणूक दिली, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली, सिनेकलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी जगाचा निरोप घेतला. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धर्मेंद्रजींनी नेहमी मला मुलासारखी वागणूक दिली, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली, सिनेकलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
Dharmendra
| Updated on: Nov 24, 2025 | 10:48 PM

भारती दुबे : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे लाखोंमध्ये त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी त्यांच्यामुळे अभिनेता बनण्याची प्रेरणा मिळाली असं विधान केले आहे. कोणत्या कलाकारांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.

टिनू वर्मा

अभिनेते टिनू वर्मा म्हणाले की, माझ्या आयुष्यात प्रवासात धरम जी आणि त्यांच्या कुटुंबाची मोठी भूमिका आहे. त्यांच्याशी ‘बेताब’चित्रपटापासून माझे संबंध आहेत. मी धरमजींसोबत ‘अपने’, ‘दुश्मन देवता’, ‘जलजला’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले. ते अ‍ॅक्शनच्या बाबतीत बब्बर शेरसारखे होते. मी माझे अर्धे आयुष्य धरम जी, सनी आणि बॉबीसोबत घालवले आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मी त्यांच्यासोबत असायचो. धरमजींच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे.

शशी रंजन

शशी रंजन यांनी म्हटले की, धर्मेंद्रजींकडून मला अभिनेता बनण्याची प्रेरणा मिळाली. मी जेव्हा त्यांचे चित्रपट पाहायचो तेव्हा मला हा देखणा माणून दिसायचा. मी हरियाणाचा आहे आणि आम्हाला देखणा आणि बलवान हिरो आवडत असत. धरमजी माझे आदर्श होते. मुंबईत गेल्यानंतर एक-दोन वर्षातच मी धरमजींना भेटलो. ते मला त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगला बोलावायचे. ते मला फोन करून त्यांच्या घरी येण्यास सांगायचे. त्यांनी मला काही चित्रपटांची शिफारसही केली. ते माझ्यासाठी वडिलांसारखे होते. जेव्हा जेव्हा मला त्यांची गरज पडायची तेव्हा मी त्यांना फोन करायचो आणि ते माझ्यासाठी हजर असायचे.

शर्मिला टागोर

अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणाल्या की, मी त्यांच्यासोबत ‘देवर’ चित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. त्यांच्याशी माझी ती पहिली भेट होती. ती खरोखरच अद्भुत होती. आम्ही रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत होतो. ते खूप आधार देणारे आणि खूप देखणे होते. ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ चे शूटिंग करत असतानाचा मला क्रिकेट पाहण्यासाठी कोलकात्याला जायचे होते. आमच्या गाण्याचे शुटींग सुरू होते. माझी दुसऱ्या दिवशी सकाळी कोलकात्याला जाणारी फ्लाईट होती. त्यामुळी मी धरमजींना विनंती केली की आज आपण थोडा जास्त वेळ शुटींग करू कारण मला उद्या जायचे आहे. आम्ही पहाटे 4-5 वाजेपर्यंत काम केले. कदाचित दुसऱ्या अभिनेत्याने मला होकार दिला नसता.

आशा पारेख

अभिनेत्री आशा पारेख म्हणाल्या की, माझ्याकडे धरमजींबाबत खुप आठवणी आहेत. ते एक चागंले व्यक्ती होते. त्यांच्यासोबत काम करताना नेहमी मजा यायची. त्यांचा स्वभाव खूप उदार होता. धर्मेंद्रजी आणि माझी पहिली भेट आये दिन बहार के या चित्रपटाच्या शुटींगवेळी झाली होती. त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. मात्र हळू हलू आमची मैत्री झाली. ते आता आपल्या नाहीत मात्र त्यांचे चित्रपट जिवंत आहेत.

समीर कर्णिक

चित्रपट दिग्दर्शक समीर कर्णिक म्हणाले की, त्यांनी नेहमी मला मुलासारखी वागणूक दिली. माझ्या चांगल्या-वाईट काळात त्यांनी मला नेहमी साथ दिली. ते एक दिलदार व्यक्तिमत्व होते. ते नेहमी चांगले चित्रपट बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. मी त्यांच्याकडून कधीही हार मानायची नाही हे तत्व शिकलो. जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुमच्यासोबतही चांगलेच होईल असा त्यांचा विश्वास होता.