Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट
Dharmendra Health Update : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. आठवडाभरापूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या त्यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी उपचार सुरू आहेत. एक आठवड्यापूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांच्या निधनाच्याही अफवा पसरल्या होत्या. अखेर देओल कुटुंबीयांच्या आग्रहाखातर डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना त्यांच्या निवासस्थानी हलवण्याची परवानगी दिली आणि तिथेच उपचार सुरू ठेवले. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिग्गज कलाकारांनी त्यांची घरी भेट घेतली. त्यांचे हेल्थ अपडेट्स या कलाकारांकडून दिले जात आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांची प्रकृती आता पहिल्यापेक्षा बरी आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने 31 ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या आठवड्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे पत्नी पूनम सिन्हासोबत धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी हेमा मालिनी यांना भेटले. या भेटीचा एक फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. धर्मेंद्र रुग्णालयात असताना सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन स्वत: कार चालवत धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी इशा देओल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला होता. त्याचसोबत अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या न पसरवण्याची विनंती केली होती. तर देओल कुटुंबीयांनी त्यांच्या खासगीपणाचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान ताज्या अपडेट्सनुसार, धर्मेंद्र ठीक असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
“गेले काही दिवस माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कष्टाचे होते. धर्मेंद्रजींच्या प्रकृतीची आम्हा सर्वांनाच खूप काळजी आहे. त्यांच्या मुलांची तर झोपच उडाली आहे. अशा कठीण काळात मी कमकुवत होऊ शकत नाही, कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण होय, ते घरी आल्यामुळे मी खुश आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले, याचा आम्हाला दिलासा आहे. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे. बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”, अशा शब्दांत हेमा मालिनी व्यक्त झाल्या होत्या.
