
Dharmendra Funeral : या महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा सलमान खान, शाहरुख खान, सलमान खान, आर्यन खान, गोविंदा यांनी रुग्णालयात त्यांची भेटी घेतली होती. परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं नंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांना डिस्चार्जदेखील देण्यात आला होता. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या निवासस्थानी आणलं गेलं होतं, जेणेकरून त्यांची प्रकृती सुधारेल. परंतु आज (24 नोव्हेंबर) कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी एक रुग्णवाहिका येताना दिसली. त्यानंतर आता धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.
धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाहून रुग्णवाहिका निघाली आणि त्यानंतर लगेचच मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीतील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. त्यानंतर हेमा मालिनी, ईशा देओल स्मशानभूमीवर पोहोचल्या. त्यांच्या पाठोपाठ आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमानसुद्धा तिथे पोहोचले. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं कळतंय. याबाबत देओल कुटुंबीयांनी अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल त्यांना मुखाग्नी देईल.
हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी सहा दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत तब्बल 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 1960 मध्ये त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 1960 ते 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2024 मध्ये ते शाहिद कपूर आणि क्रिती सनॉनच्या ‘तेरी बातों ने ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात झळकले होते. त्यानंतर आता त्यांना अखरेचा चित्रपट ‘इक्कीस’ हा येत्या 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.