Dharmendra : धर्मेंद्र यांचा पहिला पगार किती? 3 निर्मात्यांनी जमा करून दिलेली रक्कम
धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांहून अधिक कारकिर्दीत 'शोले', 'फूल और पत्थर', 'चुपके चुपके', 'सीता और गीता' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिल्या चित्रपटासाठी त्यांना किती मानधन मिळालं होतं, ते जाणून घ्या..

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. ‘ही-मॅन’, ‘ग्रीक गॉड’ म्हणून ते ओळखले जायचे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत कार्यरत होत. त्यांचा ‘इक्कीस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. परंतु त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना किती मानधन मिळालं होतं, हे तुम्हाला माहीत आहे का?
हिंदी सिनेसृष्टीतील आयकॉनिक स्टार बनण्याआधी धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी अवघे 51 रुपये मिळाले होते. हा आकडा आज चकीत करणारा असला तरी त्यावेळी तीन निर्मात्यांनी मिळून धर्मेंद्र यांना हे मानधन दिलं होतं. प्रत्येकी 17 रुपये या हिशोबाने त्यांनी 51 रुपये धर्मेंद्र यांना दिलं होतं. त्यांनी या पहिल्या पगाराचा आनंद त्यांच्या मित्रांसोबत ढाब्यावर जेऊन साजरा केला होता.
दरम्यान धर्मेंद्र यांचं आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास निधन झालं. जुहू इथल्या राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी या निवासस्थानाबाहेर जेव्हा रुग्णवाहिका पोहोचली, तेव्हा हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली होती. त्यानंतर पोलिसांनी घराबाहेर बॅरिकेडिंग केलं. तर त्याच्या काही वेळानंतर हेमा मालिनी, ईशा देओल, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान, सलमान खान, सलीम खान हे विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर दाखल झाले.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. तेव्हा देओल कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माध्यमांना आणि खोटी बातमी पसरवणाऱ्यांना फटकारलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
