Dharmendra | हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांची भावनिक पोस्ट; व्यक्त केला ‘या’ गोष्टीचा पश्चात्ताप

अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी आणि मुलींच्या आठवणीत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी ईशासोबतचा फोटो पोस्ट केला. त्यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

Dharmendra | हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांची भावनिक पोस्ट; व्यक्त केला या गोष्टीचा पश्चात्ताप
Hema Malini, Dharmendra and Esha Deol
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 29, 2024 | 4:04 PM

मुंबई : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. मात्र करणचे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि तिच्या मुली या लग्नात कुठेच दिसल्या नाहीत. मात्र इशा देओलने भावासाठी नंतर सोशल मीडियावर शुभेच्छांची पोस्ट लिहिली होती. आता धर्मेंद्र यांनी त्यांच्या या दुसऱ्या कुटुंबाच्या आठवणीत भावनिक पोस्ट लिहिली आहे. बुधवारी त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी इशासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

‘इशा, अहाना, हेमा आणि माझी सर्व प्रेमळ मुलं… तख्तानी आणि वोहरा यांच्यावर मी खूप प्रेम करतो आणि मनापासून तुम्हा सर्वांचा आदर करतो. वय आणि आजारपण मला सांगतंय की मी तुमच्याशी खासगीत बोलू शकलो असतो पण..’, अशी खंत त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. धर्मेंद्र आता 87 वर्षांचे आहेत. करणच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. धर्मेंद्रसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत लग्नाला उपस्थित होते. बऱ्याच वर्षांनंतर धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर एकत्र दिसले होते.

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

नातवाच्या लग्नानंतरही धर्मेंद्र यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘साथ जो सांस था, जानें क्यों उस साथ ने, अचानक हाथ छोड दिया’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत असंख्य चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. मुलगी इशा देओलनंही वडिलांच्या या पोस्टवर कमेंट केली होती. ‘लव्ह यू’ असं लिहित तिने वडिलांना आधार दिला होता.