
प्रदर्शनाला वीस दिवस उलटल्यानंतरही आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची जोरदार कमाई सुरूच आहे. आता या चित्रपटाने चौथ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम रचला आहे. 28 डिसेंबर रोजी ‘धुरंधर’ने जगभरात कमाईचा 1050 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यासोबतच रणवीर सिंहचा हा चित्रपट आणखी दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत ऑल टाइम सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जगभरात सुरू असलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांचाही या चित्रपटाच्या कमाईला चांगला फायदा झाला आहे. याच कारणामुळे या चित्रपटाने परदेशात 26 दशलक्ष डॉलरचा आकडा पार केला आहे. यासह गेल्या 24 दिवसांमध्ये ‘धुरंधर’चं जगभरातील कलेक्शन 1064 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
रविवारी ‘धुरंधर’ने जगभरात 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. या कमाईसह या चित्रपटाने प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ (1042 कोटी रुपये) आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ (1055 कोटी रुपये) यांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. आता येत्या काळात ‘जवान’ (1160 कोटी रुपये), केजीएफ- चाप्टर 2 (1215 कोटी रुपये) आणि ‘RRR’ (1230 कोटी रुपये) यांचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. तर टॉपमध्ये असलेल्या ‘दंगल’, ‘बाहुबली 2’ आणि ‘पुष्पा 2’ या सर्वांची कमाई 1700 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता ‘धुरंधर’ यापैकी कोणत्या चित्रपटांना मात देईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कमाईचे मोठे विक्रम आपल्या नावे केली. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने दमदार कामगिरी केली. विेशेष म्हणजे याआधी कोणत्याच भारतीय चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली नव्हती. परंतु रणवीर सिंहच्या या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 62 कोटी रुपये कमावून सर्व विक्रम मोडले.
यासह भारतातील कमाईचा आकडा 690.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी ‘धुरंधर’ची कमाई 700 कोटींपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणवीरने हमजाची भूमिका साकारली आहे. जो कराचीतील दहशतवादी टोळ्या आणि नेटवर्कमध्ये घुसखोरी करणारा भारतीय गुप्तहेर असतो. या स्पाय थ्रिलरमध्ये अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन यांच्याही भूमिका आहेत. मार्च 2026 मध्ये ‘धुरंधर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.