Dilip Joshi: ‘तारक मेहता..’मधून बाहेर पडणार? चर्चांवर ‘जेठालाल’ स्पष्टच बोलला..

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या अठरा वर्षांपासून जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आता त्यातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे.

Dilip Joshi: तारक मेहता..मधून बाहेर पडणार? चर्चांवर जेठालाल स्पष्टच बोलला..
Dilip Joshi aka Jethalal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2026 | 8:27 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी बाहेर पडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून ते या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा आणि त्यांच्या भूमिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या एक्झिटच्या चर्चांनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व चर्चांवर आता खुद्द दिलीप जोशी यांनीच मौन सोडलं आहे. गेल्या 18 वर्षांपासून मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांविषयी चिंता व्यक्त केली.

काय म्हणाले दिलीप जोशी?

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आजकाल लोक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात. माझी सर्व वृत्तसंस्था आणि माध्यमांना विनंती आहे की तुम्ही काहीही प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा छापण्यापूर्वी, ते खरं आहे की खोटं हे तपासण्यासाठी कृपया एकदा प्रॉडक्शन हाऊसकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून खात्री करून घ्या. काही लोकांसाठी सोशल मीडिया हे उत्पन्नाचं साधन बनलं आहे. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी ते कोणताही विचार न करता सर्व प्रकारच्या बातम्या प्रकाशित करतात. मी प्रतिष्ठित मीडिया हाऊस किंवा इन्फ्लुएन्सर्सबद्दल बोलत नाहीये, कारण तुम्ही प्रत्येकाला थांबवू शकत नाही. हा एक विशाल महासागर आहे.”

मालिकेला 18 वर्षे पूर्ण

‘तारक मेहता..’ ही मालिका 28 जुलै 2008 रोजी सुरू झाली होती. यावर्षी ही मालिका 18 वर्षे पूर्ण करणार आहे. हलक्याफुलक्या विनोदाने, सामाजिक विषयांनी आणि दमदार कलाकारांनी या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याविषयी दिलीप जोशी पुढे म्हणाले, “एखादा विनोदी कार्यक्रम 18 वर्षे चालणं हीच मुळात अविश्वसनीय गोष्ट आहे. आज आम्ही 4750 हून अधिक भाग पूर्ण केले आहेत. मी देवाचा आभारी आहे की आजही आम्ही सर्वजण त्याच उत्कटतेनं आणि उत्साहाने शूटिंग करत आहोत आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत आहोत. इतक्या वर्षांपासून नव्या विषयांवर नवनवीन कथा आणि भाग तयार करत राहणं सोपं नाही. असित भाई आणि संपूर्ण लेखकांची टीम त्यासाठी खूप मेहनत घेतात.”

यावेळी दिलीप यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांना बातमीची पडताळणी करण्याचं आवाहन केलं. “मला समजतंय की आपण प्रत्येक सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेवू शकत नाही. परंतु मी विनंती करतो की अशा बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी निर्मिती संस्थेशी किंवा थेट सेलिब्रिटींसी संपर्क साधावा. एका साध्या फोन कॉलमुळे चुकीच्या माहितीचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रसार रोखता येतो.”

Follow Us