राम, लक्ष्मण, भरत.. सर्वांशी जोडलेलं नाव; दीपिका रागातच म्हणाल्या “शत्रुघ्नला तरी का सोडलं?”
'रामायण' या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी बऱ्याच वर्षांनंतर अफेअरच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. अरुण गोविल, सुनील लहरी आणि संजय जोग यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना आजही चाहते त्याच रुपात पाहतात. एकीकडे ही भूमिका साकारून त्यांना देशभरात प्रचंड मानसन्मान मिळालं, तर दुसरीकडे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक अफवासुद्धा पसरवल्या गेल्या. त्याच अफवांवर दीपिका यांनी इतक्या वर्षांनंतर मौन सोडलं आहे. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यातील सर्वांत विचित्र अफवा ही ‘रामायण’ या मालिकेतील सहकलाकारांसोबत त्यांच्या अफेअरची होती.
अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन
दीपिका म्हणाल्या, “आधी माझं नाव अरुण गोविल यांच्याशी जोडलं गेलं. नंतर म्हटलं गेलं की माझं सुनील लहरी यांच्यासोबत अफेअर सुरू आहे, जे मालिकेत लक्ष्मणाच्या भूमिकेत होते. त्यानंतर भरतची भूमिका साकारणारे संजय जोग यांच्याशीही माझं नाव जोडलं गेलं.” या अफवांना वैतागून दीपिका चिखलिया यांनी मस्करीत असं काही म्हटलंय, जे ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल. त्या पुढे म्हणाल्या, “मी इतकी वैतागले होते की अखेर म्हटलं, शत्रुघ्नला तरी का सोडलं? त्यांच्यासोबतही नाव जोडायला पाहिजे होतं. मला कळतच नाही की लोक इतकं सगळं विचार तरी कसं करतात? हे फक्त विचित्रच नाही तर खूप घाबरवणारंही होतं.”
दीपिका यांनी स्पष्ट केलं की, सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट ही होती की, अफवांमध्ये जसं सांगितलं जात होतं, तशी त्यांची कोणत्याही सहकलाकारासोबत मैत्रीसुद्धा नव्हती. “त्यांच्यापैकी कोणासोबतही माझी तितकी मैत्री नव्हती. या अफवा कुठून सुरू झाल्या हे मला माहीत नाही. पण लोकांनी त्यावर विश्वास ठेवला.”
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीराम आणि दीपिका चिखलिया यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती. आजही या मालिकेतील कलाकारांकडे त्याच भूमिकांच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. दूरदर्शनवरील ही सर्वांत लोकप्रिय मालिका होती. लॉकडाऊनदरम्यान टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. दीपिका यांनी 1993 मध्ये उद्योगपती हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केलं. ते ‘श्रृंगार बिंदी’ आणि ‘टिप्स अँड टोज कॉस्मेटिक्स’चे मालक आहेत. या दोघांना निधी आणि जुही या दोन मुली आहेत.
