नाना पाटेकरांना सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; 90चं दशक गाजवणारा जादूगार
चित्रपट दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन झाले आहे. पार्थो घोष यांना थ्रिलर आणि ड्रामा चित्रपटांसोबतच सामाजिक विषयांवर बोलणेही आवडायचे. पार्थोच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणजे '100 डेज'. बॉलिवूडला त्यांनी असे अनेक हीट चित्रपट दिले.

90 चे दशक गाजवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पार्थो घोष यांचे नावही येत. त्यांना 90 मध्ये अनेक हीट चित्रपट दिले. ज्या दिग्दर्शकाने नाना पाटेकरांसारख्या अभिनेत्याला सुपरस्टार होण्याची संधी दिली. अशा दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला. वयाच्या 61 व्या वर्षी, सोमवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गौरी घोष असा परिवार आहे. पार्थो घोष यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 1990 च्या दशकात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक संस्मरणीय आणि यशस्वी चित्रपटांसाठी ते विशेषतः ओळखले जातात. यामध्ये नाना पाटेकर, मनीषा कोइराला आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
‘100 डेज’ने मिळवली प्रसिद्धी
पार्थो घोष यांनी 1991मध्ये ‘100 डेज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाने नाना पाटेकर यांना अॅक्शन हिरो आणि प्रभावी संवाद सादर करणारा नायक म्हणून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय केले. नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीला नवी दिशा देण्यात पार्थो घोष यांचा मोठा वाटा होता. ‘100 डेज’मध्ये जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सस्पेन्स आणि थरारक कथानकाने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
नाना पाटेकर यांच्यासोबत यशस्वी चित्रपटांची मालिका
‘100 डेज’च्या यशानंतर पार्थो घोष यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्नि साक्षी’ या चित्रपटात नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात मनीषा कोइरालाने घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला आणि मनीषा यांना त्यांच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळाली. त्याचप्रमाणे, 1997 मधील ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात नाना पाटेकर यांना एका वेगळ्या शैलीत सादर करत पार्थो घोष यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सामाजिक मुद्द्यांवर भाष्य
पार्थो घोष यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नेहमीच सामाजिक विषयांना हात घातला. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दलाल’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. कमी चित्रपट दिग्दर्शित करूनही, पार्थो घोष यांनी 90 च्या दशकात निर्माण केलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या कलात्मक योगदानाची आठवण करून देतात.
