
मुंबई : 18 जुलै 2023 | सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात. आजवर नेटकऱ्यांनी असंख्य सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो पाहिले असतील. सध्या अशाच एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन सुपरस्टार भावंडांचा आहे. लहानपणीच्या या फोटोंमध्ये दोघं भावंडांना ओळखणं जरा कठीण आहे. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दिसणारी ही दोन छोटी मुलं फिल्म इंडस्ट्रीतील एका दिग्गज अभिनेत्याची मुलं आहेत. तुम्ही ओळखू शकाल का?
ही दोन मुलं सुपरस्टार विनोद खन्ना यांची मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना आहेत. अक्षयने त्याच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र ज्या यशाचा तो पात्र आहे, ते त्याला मिळू शकलं नाही. ताल, हंगामा, दिल चाहता है, हलचल, दृश्यम 2, सेक्शन 375 यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर दुसरीकडे राहुल खन्नाला ‘दिल कबड्डी’ यांसारख्या काही मोजक्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलं गेलं. मात्र चित्रपटांपेक्षा अधिक तो त्याच्या फोटोशूटमुळेच चर्चेत असतो. सोशल मीडियावर अनेकदा राहुल त्याचे न्यूड फोटोशूटचे फोटो पोस्ट करतो. त्याच्या या फोटोंवर सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांसारखे स्टारकिड्ससुद्धा फिदा आहेत. इन्स्टाग्रामवर राहुलला स्टॉक (एखाद्यावर सतत लक्ष ठेवून असणे) करत असल्याचं जान्हवीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
अक्षय खन्नासुद्धा अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. तीन अफेअर्सनंतरही तो आज सिंगलच आहे. सर्वांत आधी अक्षयचं नाव तारा शर्माशी जोडण्यात आलं होतं. त्यानंतर रिया सेन आणि अक्षयच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अक्षय खन्नासुद्धा रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. पण त्यावेळी करिश्मा तिच्या करिअरच्या शिखरावर होती आणि तिची आई बबिता यांना हे नातं मंजूर नव्हतं.