Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहून चाहती बेभान; सेल्फीनंतर केलं असं कृत्य, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

या परिस्थितीला रणबीरनेही संयमाने हाताळलं. मात्र व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटींना चाहत्यांकडूनच अशी वागणूक मिळत असल्याबद्दल अनेकांनी टीका केली.

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहून चाहती बेभान; सेल्फीनंतर केलं असं कृत्य, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Ranbir kapoor
| Updated on: Mar 05, 2023 | 3:06 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रमोशननिमित्त रणबीर विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य रॉय कपूरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका चाहतीने बळजबरीने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. चाहत्यांच्या अशा वागणुकीवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता रणबीर कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या वागणुकीवरून टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शनिवारी रणबीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे झाले होते. अशातच एका चाहतीने रणबीरसोबत सेल्फी क्लिक केला. मात्र त्यानंतर तिने रणबीरला किस करण्याचा आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीला रणबीरनेही संयमाने हाताळलं. मात्र व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटींना चाहत्यांकडूनच अशी वागणूक मिळत असल्याबद्दल अनेकांनी टीका केली.

पहा व्हिडीओ

‘सेलिब्रिटी कोणताही असो, भले ती महिला असो किंवा पुरुष, मात्र चाहत्यांनी त्यांची मर्यादा पाळली पाहिजे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘मी समजू शकते की सेलिब्रिटींना पाहून चाहते अधिक उत्साही होतात, मात्र त्यांना स्पर्श करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा. हे खूप वाईट आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘कोणाच्याही परवानगीशिवाय त्या व्यक्तीला स्पर्श करणं चुकीचंच आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर ती चाहती रणबीरचा जणू विनयभंगच करतेय, असाही आरोप काहींनी केला.

रणबीरच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये तो अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत भूमिका साकारणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यनने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणबीर-आलियाची मुलगी तीन महिन्यांची झाली. आतापर्यंत त्यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.