प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्टला अटक, पत्नीविरुद्धही लूकआऊट नोटीस; नेमकं काय घडलं?

दिग्दर्शक आणि निर्माते विक्रम भट्ट यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी इतरही सात जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर विक्रम भट्टची पत्नी श्वेतांबरा भट्टविरुद्धही लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्टला अटक, पत्नीविरुद्धही लूकआऊट नोटीस; नेमकं काय घडलं?
Vikram Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 07, 2025 | 8:56 PM

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता विक्रम भट्ट, त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर आता विक्रम भट्टला अटक केल्याचं वृत्त समोर येत आहे. आयव्हीएफ फसवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. विक्रम भट्टला त्याच्या मेहुण्याच्या निवासस्थानावरून पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थान पोलीस आता विक्रमला उदयपूरला हलविण्यासाठी वांद्रे कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत. सात दिवसांपूर्वी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट, त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. या सर्वांवर इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

लूकआऊट नोटीसमध्ये सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजरप राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचसोबत परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्यास मनाई करण्यात आली होती. जवळपास 20 दिवस आधी उदयपूरमध्ये विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांच्यासह आठ जणांविरुद्ध 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. विक्रम आणि श्वेतांबरी यांनी डॉ. मुरडिया यांना 200 कोटी रुपयांच्या कमाईचं आमिष दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी भोपाळपुरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, डॉ. अजय मुरडिया (इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक) यांनी विक्रम भट्ट, त्याची पत्नी श्वेतांबरा आणि मुलगी कृष्णा, दिनेश कटारिया, मेहबूब अन्सारी, मुदित बुट्टन, गंगेश्वर लाल श्रीवास्तव आणि अशोक दुबे (सरचिटणीस, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज, मुंबई) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

डॉ. मुरडिया यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर एक बायोपिक बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता. कटारिया यांच्या सुचनेनुसार मुरडिया यांनी 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वृंदावन स्टुडिओला भेट दिली होती. याठिकाणी कटारिया यांनी त्यांची विक्रम भट्टशी ओळख करून दिली. या भेटीदरम्यान विक्रम भट्टने चित्रपट निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं आणि डॉ. मुरडिया यांना त्यानुसार पैसे पाठवण्यास सांगितलं. यावेळी विक्रमने असंही सांगितलं की त्याची पत्नी आणि मुलगी या प्रकल्पात सहयोगी म्हणून काम करतील. परंतु नंतर उघड झालं की हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं होतं आणि डॉ. मुरडिया यांच्याकडून त्यासाठी कोट्यवधी रुपये उकळण्यात आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. मुरडिया यांनी असाही आरोप केला की विक्रम भट्ट पुढे अधिकाधिक पैशांची मागणी करू लागला होता.