‘देवों के देव.. महादेव’ फेम अभिनेत्रीवर अपहरण, खंडणीचा आरोप, FIR दाखल, होऊ शकते अटक

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या दोघांविरोधात एफआयआर दाखल झाली असून त्यांना अटकसुद्धा होऊ शकते. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात..

‘देवों के देव.. महादेव’ फेम अभिनेत्रीवर अपहरण, खंडणीचा आरोप, FIR दाखल, होऊ शकते अटक
पूजा बॅनर्जी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2025 | 12:32 PM

‘देवों के देव.. महादेव’ या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जीने काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. पूजा आणि तिचा पती कुणाल वर्मा यांच्यासोबत मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच बंगाली चित्रपट निर्माते श्याम सुंदर डे यांनी पूजा आणि कुणालवर गंभीर आरोप केले आहेत. गोव्यात माझं अपहरण केलं आणि माझा छळ केला, अशी तक्रार त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर श्याम यांची पत्नी मालविका डे यांनी पूजा आणि कुणालविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्माविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलकाता इथल्या रहिवाली मालविका डे यांच्या मते, ही घटना 31 मे ते 4 जून दरम्यान घडली. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “माझे पती श्याम सुंदर डे हे गोव्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारने प्रवास करत होते. आरोपींनी त्यांना मधेच थांबवलं आणि जबरदस्तीने अपहरण करून त्यांना एका व्हिलामध्ये ओलीस ठेवलं होतं. आरोपींनी त्यांच्यावर हल्लासुद्धा केला आणि ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकंच नव्हे तर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी ओलीस ठेवलं होतं आणि त्यांच्याकडून 23 लाख रुपये उकळले.”

गोवा पोलिसांनी सांगितलं की त्यांना पश्चिम बंगालच्या विधाननगर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त कार्यालयातून एक झिरो एफआयआर मिळालं होतं, त्यानंतर गुरुवारी गोव्यातील कलंगुट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी श्याम सुंदर डे आणि मालविका डे यांना याप्रकरणी चौकशीसाठी 2 जुलै रोजी कलंगुट पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर याप्रकरणातील सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पूजा बॅनर्जी आणि तिच्या पतीविरोधात कलम 126 (2) (चुकीनं रोखणं), 137 (2) (अपहरण), 140 (2) (हत्या किंवा खंडणीसाठी अपहरण करणं), 308 (5) (खंडणी), 115 (2) (स्वेच्छेनं दुखापत करणं), 351 (3) (गुन्हेगारीच्या उद्देशाने धमकी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पूजा आणि कुणालने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.

“आमच्यासाठी गेले दोन-तीन महिने खूप कठीण होते. आम्हाला कळत नव्हतं की आता पुढे काय होणार? आमची आर्थिक फसवणूक झाली. त्यात आम्ही खूप मोठी रक्कम गमावली. त्यामुळे आम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे. आम्हाला हार मानायची नाहीये. या फसवणुकीत आम्ही आमच्या बचतीचे सर्व पैसे गमावले आहेत. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला पाठिंबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देवावर पूर्ण विश्वास आहे”, असं पूजा या व्हिडीओत म्हणाली होती.