मोठी बातमी! ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवच्या घरावर अंधाधुंद गोळीबार

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्या घरावर अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पाच ते सहा राऊंड फायरिंग करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरू केला आहे.

मोठी बातमी! बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवच्या घरावर अंधाधुंद गोळीबार
Elvish Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2025 | 9:40 AM

प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी या शोचा विजेता एल्विश यादवच्या घरावर आज (रविवार) पहाटे गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील सेक्टर 56 इथल्या एल्विशच्या घरावर पाच ते सहा राऊंड फायरिंग करण्यात आली. गोळीबाराच्या घटनेवेळी एल्विश त्याच्या घरात नव्हता. त्यावेळी घरात फक्त केअरटेकर उपस्थित होता आणि त्यानेच पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप एल्विशकडून कोणतीची तक्रार किंव एफआयआर दाखल झालेली नाही. गोळीबाराची घटना रविवार पहाटे 5.30 ते 6 च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला.

गुरुग्राममधील एल्विशच्या घरी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. गोळीबाराच्या खुणा आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी ही टीम पोहोचली आहे. हा गोळीबार एल्विशला धमकावण्यासाठी करण्यात आला असावा, असं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे. परंतु गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर एल्विशचे चाहते त्याच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. एल्विश किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून याप्रकरणी अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. एल्विशच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच हे प्रकरण उलगडण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती पोलिसांनी दिली. जर एल्विशने तक्रार दाखल केली तर तपास आणखी तीव्र होऊ शकतो.

युट्यूबर एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी 2’ या शोचं विजेतेपद जिंकलं होतं. शो जिंकल्यापासून तो विविध कारणांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत होता. बिग बॉसमुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. देशभरात त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र त्याचसोबत विविध कॉन्ट्रोवर्सीमुळे तो सतत चर्चेत राहिला.

‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो जिंकल्यापासून एल्विशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. म्युझिक व्हिडिओपासून ते चित्रपटांपर्यंत त्याला असंख्य ऑफर्स आले. अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतही त्याने एक म्युझिक व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर एल्विशने दुबईमध्ये स्वत:चं आलिशान घरदेखील खरेदी केलं.