ही निळी साडीवाली कोण? सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होणाऱ्या गिरीजाची पहिली प्रतिक्रिया
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या एका मुलाखतीनंतर सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. निळ्या साडीतील तिचा साधा पण तितकाच आकर्षक लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. यावर आता गिरीजाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘ही निळ्या साडीतली महिला आहे तरी कोण’, ‘ही सुंदरी कोण’ असे प्रश्न असंख्य नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर विचारले जात आहेत. तर निळ्या साडीतली ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आहे. नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीसाठी तिने कॉटनची निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचा हा साधा पण तितकाच आकर्षक लूक अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. गिरीजाचे निळ्या साडीतील हे सुंदर फोटो व्हायरल होताच अनेकांनी तिच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मराठी कलाविश्वात ती आधीपासूनच प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे हे अनेकांना माहीत नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मला तर हे फार रंजक वाटतंय. रविवारी संध्याकाळी माझा फोन सतत वाजत होता. मी नाटकाच्या तालमीला गेले होते आणि त्यामुळे फोन उचलू शकले नव्हते. अचानक माझ्या मित्रमैत्रिणींनी मला मेसेज करायला सुरुवात केली. एक्सवर (ट्विटर) काय चाललंय हे तुला माहितीये का? एकाने मला पोस्ट पाठवली, ज्यामध्ये लोकं चर्चा करत होते की ही प्रिया बापट आहे की गिरीजा ओक. मग माझ्या दीराने काही माझे व्हायरल पोस्ट पाठवले. काही पेजेसवर मला ‘सेक्सी’ असं म्हटलं गेलं. पण या सर्वांत मराठी चाहते म्हणत होते की, तुम्ही तिला आता पाहिलंत. आम्ही मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिला ओळखतोय”, असा अनुभव गिरीजाने सांगितला.
View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “एक समजूतदार व्यक्ती म्हणून याबद्दल बोलायचं झाल्यास, हा एक ट्रेंड आहे, जो येतो आणि जातो. पण माझं जे काम आहे, ते इथेच राहणार आहे. जर लोकांना आता माझ्या कामाबद्दल समजत असेल, तर मला जास्त आनंद होईल.”
गिरीजा ओकची कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिचे वडील गिरीश ओक दिग्गज अभिनेते आहेत. तिचे सासरे निर्माते आणि पती दिग्दर्शक आहे. गिरीजाने मराठीसोबतच हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्येही काम केलंय. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
