अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका सेंद्रिय शेतीला भेट दिली. माजी सैनिकांनी सुरू केलेल्या या 528 एकर शेतीत डाळिंब आणि आंबा लागवड करण्यात आली आहे. गोविंदा यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आणि विषमुक्त शेतीची गरज असल्याचंही त्याने म्हटलं.

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा हा नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीतामध्ये असलेले वाद असतील किंवा त्यांचा घटस्फोटाच्या अफवा असतील अथवा गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा असतील. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याचे कुटुंब या अशा चर्चांमुळे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. पण त्याचे कौटुंबिक वाद वगळता तो आजही लोकांच्या मनावर राज्य करतो. त्याने पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये सक्रिय व्हावं असं चाहत्यांना नेहमी वाटतं.
गोविंदाने दिली माजी सैनिकाच्या सेंद्रिय पद्धतीतील शेतीला भेट
दरम्यान गोविंदा हा नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेताना दिसतच असतो. आताही तो अशाच एका भेटीमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाने नाशिकच्या मालेगाव येथील अजंग वडेल येथे उभारलेल्या व्यंकटेश्वरा फार्म येथे भेट दिली आहे. माजी सैनिक शिवाजीराव डोळे जे आता एक शेतकरी म्हणून त्यांची शेती फुलवतायत. शिवाजीराव यांच्या नेतृत्वात 528 एकरात सेंद्रिय पद्धतीतील शेती करण्यात आली आहे. डाळिंब व आंबा फळबाग असे प्रकल्प शिवाजीराव डोळे यांनी राबवले आहेत. याच प्रकल्पांना भेट देत गोविंदाने या सर्वांची माहिती घेतली. या प्रकल्पाची सर्व माहिती घेत गोविंदाने गावकऱ्यांशीही गप्पा मारल्या.
माजी सैनिकांनी केलेल्या मेहनतीचे तोंड भरून कौतुक
गोविंदा यांनी माजी सैनिकांनी केलेल्या मेहनतीचे तोंड भरून कौतुक केले.आपल्या फिल्मी स्टाईल मध्ये डायलॉग घेत ‘ इतनी खुशी मुझे आज तक नही मिली ‘ असे म्हणत माजी सैनिकांच्या या कार्याचे कौतुक केले..विषमुक्त शेती व सेंद्रिय शेतीची ही काळाची गरज असल्याचंही अभिनेता गोविंदा यांनी म्हटलं आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ‘ जय जवान जय किसान ‘ चा नाराही दिला.
गोविंदाच्या नवीन चित्रपटांची प्रेक्षकांना आतुरता
दरम्यान गोविंदाचे कोणते नवीन चित्रपट येणार आहेत आणि पुन्हा गोविंदाची भन्नाट स्टाइल पाहायला मिळण्याची चाहते वाटत पाहतायत. तसेच गोविंदाने कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणाही केली होती. त्यामुळे आता खरोखरंच प्रेक्षक त्याच्या नवीन चित्रपटाची वाट पाहत आहेत.
