हेमा मालिनी यांचा 37 वर्षांपूर्वीचा चित्रपट आता का होतोय रिलीज? कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का
37 वर्षांपूर्वीचा रजनीकांत- शत्रुघ्न सिन्हा आणि हेमा मालिनी यांचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होता आहे.

Bollywood Movies : काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने काही दिवसांमध्येच अनेक चित्रपटांचे कमाईमध्ये रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दुर्मीळ आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुपरस्टार रजनीकांत, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि अनिता राज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा चित्रपट ‘हम में शहंशाह कौन’ तब्बल तीन दशकांनंतर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. 1989 मध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट अनेक कारणांमुळे आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नव्हता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत हर्मेश मल्होत्रा यांनी केले आहे तर निर्मितीची जबाबदारी राजा रॉय यांनी सांभाळली होती. राजा रॉय हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांचे भाऊ आहेत. चित्रपटात त्या काळातील अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये प्रेम चोप्रा, शरत सक्सेना, अमरीश पुरी आणि जगदीप यांसारख्या नावांचा समावेश आहे.
रिलीज का झाला नाही चित्रपट?
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर राजा रॉय लंडनला रवाना झाले. त्यानंतर हा प्रोजेक्ट अडचणीत सापडला आणि अनेक वर्षे तो तसाच रखडला. कालांतराने चित्रपट पुन्हा सुरू करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र वैयक्तिक आणि व्यावसायिक अडथळ्यांमुळे ते शक्य झाले नाही.
राजा रॉय यांच्या मुलाचे अकाली निधन झाले तसेच दिग्दर्शक हर्मेश मल्होत्रा यांच्या निधनामुळे हा प्रोजेक्ट पुन्हा अडकला. मात्र, सर्व अडथळ्यांवर मात करत राजा रॉय यांनी भारतात परत येऊन हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार केला.
राजा रॉय यांची भावनिक प्रतिक्रिया
चित्रपटाच्या रिलीजबाबत बोलताना राजा रॉय म्हणाले, आम्ही या चित्रपटाबाबत कधीच आशा सोडली नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या. तरीही हा चित्रपट टिकून राहिला. आज आम्ही तो अखेर सिनेमागृहात प्रदर्शित करत आहोत. हा चित्रपट फक्त एक प्रोजेक्ट नाही तर माझ्यासाठी तो माझ्या मुलासारखा आहे.
‘हम में शहंशाह कौन’ हा एक अॅक्शन आणि सूडावर आधारित चित्रपट असल्याचे राजा रॉय यांनी स्पष्ट केले. प्रेक्षकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नव्या पिढीचे तंत्रज्ञान वापरताना चित्रपटाची मूळ आत्मा आणि कलाकारांच्या अभिनयाशी कोणताही तडजोड करण्यात आलेली नाही. अंतिम निर्णय आता प्रेक्षकांच्या हातात आहे.
