
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. देओल कुटुंबाने अलीकडेच त्यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांचे कुटुंब आणि शाहरुख खान ,सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळी खरंतर सगळेच त्यांच्या आठवणीत भावुक झालेले दिसले. दरम्यान त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा राहिले आहे. विशेषत: धर्मेंद्रने 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांचे आधीच प्रकाश कौरशी लग्न झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना चार मुले होती. त्यामुळे त्यांचे दुसरे लग्न हा वादाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे.
दोन्ही कुटुंबांची जबाबदारी वेगवेगळी सांभाळण्याची जबाबदारी
धर्मेंद्र यांचे दुसऱ्या लग्नानंतर अर्थातच दोन कुटुंबे झाली होती. पण हेमा मालिनी या कधीही प्रकश कौर यांना भेटल्या नव्हत्या किंवा त्यांची तसे चांगले संबंध निर्माण झाले नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची जबाबदारी वेगवेगळी सांभाळण्याची जबाबदारी धर्मेंद्र यांच्यावर आली होती. मग ते दोन्ही कुटुंबांना कसे सांभाळायचे? हा प्रश्न नक्कीच अनेकदा चाहत्यांना पडलेला. असाच प्रश्न एका मुलाखतीत धर्मेंद्र आणि हेमा यांची मुलगी ईशाला विचारण्यात आला होता.
धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबात हस्तक्षेप करायचा नव्हता.
2022 च्या एका जुन्या मुलाखतीत, ईशा देओल तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत सोबत उपस्थित होती. त्या मुलाखतीदरम्यान, तिने सांगितले की तिचे वडील त्यांचे दोन्ही कुटुंब इतके चांगले कसे काय सांभाळू शकतात हा प्रश्न पडायचा. लग्नानंतर हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्यापासून नेहमीच वेगळ्या राहिल्या होत्या. कारण हेमा यांना धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबात हस्तक्षेप करायचा नव्हता. पण तरीही धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंब खूप चांगल्या प्रकारे हाताळली.
हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्याकडून फक्त ही गोष्ट हवी होती
राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “एक वेळ अशी आली जेव्हा मला त्यांना सांगावे लागले की, आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. आपण असे पुढे जाऊ शकत नाही. मला माहित होते की काही समस्या असतील, पण मी त्याच्यांकडून दुसरे काहीही अपेक्षा करत नव्हते आणि नाही. मला फक्त प्रेम हवं होतं. ते नेहमीच माझ्यासोबत असायचे, मग मला आणखी काय हवं होतं? मला त्यांच्याकडून मालमत्ता, पैसा किंवा इतर काहीही नको आहे. मला फक्त थोडं प्रेम हवं आहे. बस एवढेच.”
धर्मेंद्रने दोन्ही कुटुंबांना सुंदरपणे सांभाळले
जेव्हा ईशाला तिचे वडील आणि तिचे भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, “आम्ही कुटुंब म्हणून खूप खाजगी आहोत. मला माझे भाऊ कधीही वेगळे वाटले नाही.ते मला खूप आवडतात. ते नेहमीच माझ्यासाठी उभे राहिले आहेत आणि माझे वडील नेहमीच माझ्यासाठी आहेत. माझ्या वडिलांबद्दल मला जे आवडते ते म्हणजे ते इतक्या मोठ्या मनाची व्यक्ती आहेत. तसेच ते दोन्ही बाजू सुंदरपणे सांभाळू शकतात. मी त्यांना याचे सगळे श्रेय देते.”