थरथरणारे हात, भेदरलेला चेहरा; वडिलांच्या निधनाने धक्क्यात असलेली लेक ईशा देओल; स्मशानभूमीतील हृदय पिळवटणारा व्हिडिओ समोर
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी ईशा देओल वडिलांच्या जाण्याने कोलमडून गेली होती. तिचे थरथरणारे हात आणि भेदरलेला चेहरा असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून ती किती धक्क्यात होती याची जाणीव होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील राहत्या घरी 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरातही त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र त्यांनी आज या जगातून एक्झीट घेतली आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने सामान्यांपासून ते राजकीय मंडळी, कलाकार सर्वांनाच धक्का बसला आहे.
अत्यंत शोकपूर्ण वातावरणात धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले
विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकपूर्ण वातावरणात धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार स्मशानभूमीत उपस्थित होते.धर्मेंद्र यांचा ज्येष्ठ पुत्र सनी देओलने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी असंख्य चाहत्यांनी स्मशानभूमीबाहेर त्यांना श्रद्धांजली देत दुःख व्यक्त केलं. अंत्यविधीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, अनिल कपूर यांसह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमी बाहेर गर्दी जमली होती.
ईशा देओलचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचेही मन हेलावले
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर नक्कीच देओल कुटुंबार काय आघात झाला असेल याची कल्पना करू शकत नाही. सनी देओल, बॉबी देओल, तसेच पत्नी हेमा मालिनी आणि मुली इशा-आहाना सर्वजण या धक्क्यातच दिसत होते. दरम्यान वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच इशा देओल तातडीने विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचली होती तेव्हाचा तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत ईशा वडिलांच्या विरहानं कोलमडलेली दिसत आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू, चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारे दुःख स्पष्टपणे जाणवत होते.
थरथरणारे हात, भेदरलेला चेहरा, अशी झाली होती ईशा देओलची परिस्थिती
स्मशानभूमीकडे जाताना तिचे थरथरणारे हात, भेदरलेला चेहरा अन् झालेली घबराहट स्पष्टपणे दिसत होतं की वडिलांच्या जाण्याने ती प्रचंड धक्क्यात होती. हे सर्व क्षण हृदय पिळवटणारे होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हजारो लोकांनी सहानुभूती अन् दु:ख व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
मनोरंजन जगतातील एक युग संपलं
धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना अनेक कलाकार आणि चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली साधेपणा, दिलदारपणा, त्यांचा प्रेमळ स्वभाव, मोठं मन याबद्दल सगळेच कलाकार बोलताना दिसत आहेत. आज त्यांच्या जाण्यानं संपूर्ण मनोरंजन विश्व भावुक झालं आहे.
25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट
धर्मेंद्र यांनी जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांपैकी अनेक चित्रपट हीट राहिले आहेत. धर्मेंद्र वयाच्या 89 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये सक्रिय राहिले. त्यांनी “रॉकी और रानी की प्रेम कहानी” आणि “तेरी बातें… में ऐसा उलझा जिया” या चित्रपटांमध्ये दिसले, जिथे त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना या वयातही मंत्रमुग्ध केले होते. आता ते अमिताभ यांचे नातू अगस्त्य नंदाच्या “21 किज” या चित्रपटात दिसणार आहेत. पण हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला, जो या वर्षी 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दुर्दैवाने, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांचे निधन झाले.
