जीवतोड मेहनत करूनसुद्धा..; ईशा केसकरने सांगितलं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ सोडण्यामागचं खरं कारण
अभिनेत्री ईशा केसकरने 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. परंतु चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

अभिनेत्री ईशा केसकरने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या लोकप्रिय मालिकेला नुकताच रामराम केला. या मालिकेत तिने कलाची भूमिका साकारली होती. मालिकेत कलाचं निधन झाल्याचं दाखवलं असून तिच्या जागी आता अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एण्ट्री झाली आहे. परंतु ईशाच्या एक्झिटनंतर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कलाच्या भूमिकेत आम्हाला ईशा केसकरच हवी, अशी मागणी काहींनी केली. आता खुद्द ईशाने मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने मालिका अचानक का सोडावी लागली, याविषयी सांगितलं आहे.
‘मुंबई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून मी सलग काम करत होते. जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता, तरीसुद्धा मी शूटिंग करत होते. अखेर डोळ्याची दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. जर मी आता डोळ्यासाठी विश्रांती घेतली नाही तर पुढे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भविष्यात मला कदाचित डोळ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. ज्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला.”
“मी मालिका सोडणार असल्याचं टीमला सप्टेंबर महिन्यातच कळवलं होतं. कारण जेव्हा मला चिकनगुनिया आणि फुड पॉइझन झाला होता, तेव्हासुद्धा टीमने मला खूप समजून घेतलं होतं. आता पुन्हा डोळ्याच्या दुखापतीमुळे मी सतत सुट्टी घेऊ शकत नाही. त्यामुळेच मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मला माझ्या आरोग्याकडे लक्ष देता येईल. जीवतोड मेहनत करून आपण पैसे कमावतो, पण जर त्याचा उपभोगच घेता येत नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणूनच थोड्या विश्रांतीसाठी मी थांबायचं ठरवलं आहे. थोड्या ब्रेकनंतर मी पुन्हा कामाला सुरुवात करेन”, असं ईशाने स्पष्ट केलं.
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत ईशाची जागा अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरने घेतली आहे. या मालिकेत ईशा गेल्या दोन वर्षांपासून कलाची भूमिका साकारत होती. आता नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. हे नवं पात्र नक्षत्रा मेढेकर साकारणार आहे.
