
Google Gemini : सध्या सोशल मीडियावर एआय फोटोंचा ट्रेंड आहे. जो तो आपले फोटो ‘गुगल जेमिनाय’ (Google Gemini) किंवा ‘चॅट जीपीटीवर’ (ChatGPT) एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करतोय. आधी ‘घिबली’ फोटोंचा ट्रेंड होता आणि त्यानंतर आता ‘गुगुल जेमिनाय रेट्रो एआय’ फोटोंचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत तुम्ही हा ट्रेंड पाहिला असेलच किंवा त्यात सहभागीही झाला असाल. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही या ट्रेंड्सची भुरळ पडते. तर काहीजण सेलिब्रिटींचे फोटो एआयमध्ये एडिट करून व्हायरल करत आहेत. एकीकडे या ट्रेंडला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी कपूरने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “जेव्हा मी कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करते, तेव्हा माझे कित्येक फोटो AI मध्ये एडिट करून माझ्या मर्जीविना, परवानगीविना व्हायरल झालेले पहायला मिळतात. तुम्हाला आणि मला समजेल की हे AI इमेज आहे, परंतु सर्वसामान्यांना वाटेल की, हिने हे सर्व काय घातलंय? याबाबतीत मी खरंच जुन्या विचारांची आहे. माणसांच्या क्रिएटिव्हिटीची सुरक्षा आणि कथाकथनातील प्रामाणिकता यावर मी अधिक भर देते.” जान्हवीच्या या मताचं अभिनेता वरुण धवननेही समर्थन केलं. वरुणनेही एआयच्या या ट्रेंडला भयानक असं म्हटलं आहे. “तंत्रज्ञान हे दुधारी तलवार आहे. त्याचे फायदे तर अनेक आहेत, पण तितकेच नुकसानसुद्धा आहेत”, असं वरुण म्हणाला.
याविषयीने वरुणने पुढे सांगितलं, “तंत्रज्ञानाच्या बाबतीत मदत होतेच, पण त्याचे असंख्य नुकसान आहेत. अभिनेते, अभिनेत्री आणि त्यांच्या ओळखीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी कायदा आणि नियमांची आवश्यकता आहे. अखेर मानवी भावनाच चित्रपटाला खास बनवतं. कोणतंच अल्गोरिदम या मानवी भावनांना कॉपी करू शकत नाही.”
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवन आगामी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल यांच्याही भूमिका आहेत. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.