
प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर ते त्यांची मतं मोकळेपणे मांडतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अख्तर यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण जावेद यांनी ही पोस्ट मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर लिहिली आहे. त्यामुळे त्यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना ही पोस्ट लिहिल्याचं म्हटलं जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयाने गुरुवारी निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निकालावरून अख्तर यांनी ताशेरे ओढले आहेत.
जावेद यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘पुलिस वाले करें भी तो करें क्या.. तलाशें भी तो वो कितनी तलाशें… कोई कातिल नहीं होता किसी का.. खुद अपना कत्ल कर लेती है लाशें’ (पोलीस तरी काय करतील, शोध तरी किती घेतील, कोणीच कोणाचा मारेकरी नसतो, मृतदेह स्वत:चीच हत्या करून घेतात.) जावेद अख्तर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी नाव न घेता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावरून हा संताप व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. अख्तर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कुठेच मालेगावचा उल्लेख केला नाही.
Police valay Karein bhi to karein kya / talashein bhi to voh kitna talashein / koi qatil nahin hota kisi ka / khud apna qatl kar leti hain laashein
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 31, 2025
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासही सातही आरोपींची 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून गुरूवारी निर्दोष सुटका करण्यात आली. केवळ दाट संशय हा खऱ्या पुराव्यांची जागा घेऊ शकत नाही आणि आरोपींच्या दोषसिद्धीसाठी विश्वासार्ह पुरावे नाहीत, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण विशेष न्यायालयाने हा निकाल देताना नोंदवलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणा आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादातील त्रुटींवर बोट ठेवताना सर्व आरोपींना संशयाचा फायदा द्यायला हवा, असंही न्यायालयाने म्हटलंय.