
मुंबई | 26 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं २४ जुलैला वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. जयंत सावरकर यांच्या निधनामुळे चाहत्यांसह मराठी सिनेविश्वाला देखील मोठा धक्का बसला आहे. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. जयंत सावरकर यांच्या निधनाला वडापाव जबाबदार असल्याची चर्चा रंगत आहे. वडापाव खाणं गैर नाही, पण जयंत सावरकर यांची प्रकृती खालावली होती. वडा खाल्ल्यामुळे ॲसिडिटी झाली असं देखील सांगितलं जात आहे. प्रसिद्ध अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी जयंत सावरकरांच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र जयंत सावरकर यांची चर्चा रंगत आहे.
जयंत सावरकर यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या शोकसभेत मंगेश देसाई यांनी अण्णांबद्दलच्या आठवणींनी उजाळा दिला आहे. मंगेश देसाई म्हणाले, ‘अण्णांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकरली. त्यांना एखादा रोल आवडला तरच त्यासाठी ते होकार द्यायचे. त्यांनी पैशांसाठी कधीच काम केलं नाही..’
‘मला रोल आवडला तर मी ती भूमिका साकारणार…’ असे जयंत सावरकर यांचे विचार होते. अण्णांचा हजरजबाबी स्वभाव देवाला कुठे तरी पाहावासा वाटला. १२ जुलै रोजी त्यांनी वडा खाल्ला. त्यामुळे त्यांनी ॲसिडिटी झाली. १३ जुलैला ते जेवले नाहीत. १४, १५ जुलैदरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.’ असं देखील मंगेश देसाई म्हणाले. सध्या सर्वत्र मंगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
रंगभूमीवर पदार्पण करण्याआधी जयंत सावरकर हे नोकरी करायचे. नोकरी करत नाटकाचं वेड जपणाऱ्या जयंत यांनी एका क्षणाला नोकरी सोडून पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. ‘एकच प्याला’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकांमध्ये त्यांनी दमदार काम केलं.
नाटक आणि चित्रपटांशिवाय ते मालिकांमध्येही झळकले. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’ या वेब सीरिजमध्येही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सर्वच पातळीवर त्यांनी आपला ठसा उमटविला होता.