559 कोटींची प्रॉपर्टी विकणाऱ्या जितेंद्र यांच्याकडे तब्बल 16000000000 रुपये संपत्ती

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र हे नुकत्याच त्यांच्या एका रिअल इस्टेट डीलमुळे चर्चेत आले आहेत. मुंबई उपनगरातील एक व्यावसायिक मालमत्ता त्यांनी कोट्यवधी रुपयांना विकली आहे. त्यानंतर त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा होऊ लागली आहे.

559 कोटींची प्रॉपर्टी विकणाऱ्या जितेंद्र यांच्याकडे तब्बल 16000000000 रुपये संपत्ती
Jitendra and Tusshar Kapoor
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल | Updated on: Jan 14, 2026 | 3:34 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांनी मुंबईतील त्यांची एक व्यावसायिक मालमत्ता जपानच्या एनटीटी ग्रुपच्या एका युनिटला विकली आहे. तब्बल 559 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला आहे. मुंबई उपनगरातील चांदिवली परिसरात ही मालमत्ता होती. बालाजी आयटी पार्कमधील 30,195 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा जपानच्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने विकत घेतली आहे. विशेष म्हणजे याआधी मे 2025 मध्ये जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने अंधेरीमधील एक जमीन तब्बल 855 कोटी रुपयांना विकली होती. ही रिअल इस्टेट मार्केटमधील सर्वांत महागड्या करारांपैकी एक होती. या करारादरम्यान नेटकऱ्यांमध्ये जितेंद्र आणि तुषार कपूर यांच्या संपत्तीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन यांची नावं अनेकदा घेतली जातात. पण जितेंद्र आणि तुषार कपूर यांची नावं फारशी कधी समोर आली नव्हती.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र यांची एकूण संपत्ती 1,500 ते 1,600 कोटी रुपयांदरम्यान आहे. त्यांचा मुलगा तुषारसुद्धा अभिनेता आहे, तर मुलगी एकता कपूर ही प्रसिद्ध टीव्ही निर्माती आहे. तुषारची एकूण संपत्ती 90 ते 100 कोटी रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज आहे. जितेंद्र यांनी 1960 ते 1980 च्या दशकात 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त जितेंद्र यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. यामध्ये बालाजी टेलिफिल्म्स अँड प्रॉडक्शन्स, रिअल इस्टेट गुंतवणूक आणि इतर गुंतवणुकींचा समावेश आहे.

जितेंद्र हे आता एक यशस्वी उद्योजक आहेत. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही निर्मिती संस्थांमधून जवळपास 422 कोटी रुपयांचं उत्पन्न निर्माण होतं. याशिवाय जितेंद्र हे जुहू इथल्या ‘कृष्णा’ नावाच्या आलिशान बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपये इतकी आहे. जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरनेही बॉलिवूडमध्ये काम केलंय. सध्या तो निर्मिती क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. तर एकता कपूर ही ‘सीरिअल क्वीन’ म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती तिने केली आहे.