जितेंद्र-तुषार कपूर यांनी तब्बल इतक्या कोटींना विकली मुंबईतील प्रॉपर्टी; आकडा वाचून विस्फारतील डोळे!
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर हे सध्या त्यांच्या एका रिअल इस्टेटमधील करारामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांनी मिळून मुंबई उपनगरातील त्यांची एक मालमत्ता भरभक्कम रकमेला विकली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांनी मुंबईत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील चांदिवली परिसरातील एक व्यावसायिक मालमत्ता भरभक्कम रकमेला विकली आहे. ही मालमत्ता त्यांनी जपानच्या एनटीटी ग्रुपच्या एका शाखेला तब्बल 559 कोटी रुपयांना विकली आहे. मंगळवारी एका रिअॅल्टी सल्लागाराने शेअर केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. ‘शेअर यार्ड्स’ने शेअर केलेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार, एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने बालाजी आयटी पार्कमधील 30,195 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तब्बल 559.24 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या जागेची मालकी तुषार कपूर आणि जितेंद्र यांच्या पॅन्थेऑन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे.
या जागेच्या खरेदीबाबतची नोंदणी 9 जानेवारी रोजी झाली. कागदपत्रांनुसार, या करारात चांदिवली उपनगरातील आयटी पार्कमध्ये ग्राऊंड प्लस दहा मजली इमारत, डीसी-10, एक डेटा सेंटर आणि शेजारील चार मजली डिझेल जनरेटर स्ट्रक्चर खरेदी करणं यांचा समावेश आहे. 2024 च्या सरकारी ठरावानुसार, विक्रीसाठी कोणतंही मुद्रांक शुल्क आकारलं जात नाही, असं त्यात म्हटलं आहे. तसंच त्यात 5.59 लाख रुपयांचा मेट्रो उपकर भरण्यात आला आहे. याआधी मे 2025 मध्ये जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने अंधेरीमधील एक जमीन तब्बल 855 कोटी रुपयांना विकली होती. ही रिअल इस्टेट मार्केटमधील सर्वांत महागड्या करारांपैकी एक होती.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक काळ गाजवणारे सर्वांत लोकप्रिय अभिनेते जितेंद्र हे आता एक यशस्वी उद्योजक आहेत. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही निर्मिती संस्थांमधून जवळपास 422 कोटी रुपयांचं उत्पन्न निर्माण होतं. याशिवाय जितेंद्र हे जुहू इथल्या ‘कृष्णा’ नावाच्या आलिशान बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपये इतकी आहे. जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरनेही बॉलिवूडमध्ये काम केलंय. सध्या तो निर्मिती क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. तर जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर ही ‘सीरिअल क्वीन’ म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती तिने केली आहे.
