अमित शाहांवर संसदेत दगडफेक…कंगना राणौतचा गंभीर आरोप

या विधेयकावरून बुधवारी संसदेत बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाहांवर दगड फेकलं, असं त्यांनी म्हटलंय.

अमित शाहांवर संसदेत दगडफेक...कंगना राणौतचा गंभीर आरोप
Kangana Ranaut and Amit Shah
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2025 | 12:51 PM

देशातील राजकारण स्वच्छ आणि नैतिक करण्याच्या हेतून ‘130 वी घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके गुरूवारी लोकसभेत सादर करण्यात आली. या विधेयकांना टोकाचा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. तृणमूलच्या खासदारांनी विधेयकांच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावले. यावरून आता खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी मोठा दावा केला आहे.

विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कंगना यांनी मोठा आरोप केला आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी अमित शाह यांच्या तोंडावर दगडफेक केल्याचं त्यांनी म्हटलंय. संसदेत काय घडलं, याविषयी विचारलं असता कंगना यांनी सांगितलं, “अमित शाह विधेयक मांडत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माइक काढण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांनी विधेयकाची प्रत फाडली आणि त्याचे तुकडे शाहांवर फेकले. काही खासदारांनी त्यांच्यासोबत दगडही आणले होते, जे ज्यांनी कागदासह अमित शाहांच्या चेहऱ्यावर फेकले.”

अमित शाह यांनी 130 व्या घटनादुरुस्ती विधेयकासह केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासन दुरुस्ती विधेयक आणि जम्मू-काश्मीर फेररचना दुरुस्ती विधेयक, ही दोन विधेयकं बुधवारी लोकसभेत मांडली. लाचखोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा एखाद्या मंत्र्याला सलग 30 दिवसांचा कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरून आपोआप हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे. मात्र हा कायदा झाला तर त्याचा राजकीय गैरवापर केला जाऊ शकतो, असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांची सत्ता असलेली राज्ये जबरदस्तीने बळकावण्याचा हा कट असल्याची टीका ‘इंडिया’ आघाडीने केली. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या विधेयकांना तीव्र विरोध केला. विधेयक मंजूर झाल्यास त्याचा पहिला फटका पश्चिम बंगालमध्ये बसू शकतो अशी चर्चा बुधवारी संसदेच्या आवारात रंगली होती.

दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात अटक झाली होती. शाहांनी तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता का, असा सवाल काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “माझ्याविरोधात आरोप चुकीचे होते. मी नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा दिला होता. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी एकाही संविधानिक पदावर काम केलं नाही.”