Kangana Ranaut यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी भन्नाट डान्स, महिलांसोबत धरला ठेका, कॅप्शनची होतेय चर्चा
कंगना रनौत यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्तांसोबत साजरी केली पहिली तीज; याचेच फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी या फोटोंना हटके कॅप्शन दिलं. ज्याची सोशल मीडियावर रंगलीय प्रचंड चर्चा.

अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत सध्या त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यामुळे चर्चेत आहेत. कंगना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या घरी जाऊन तीज सण साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये कंगना इतर महिलांसोबत तीज साजरी करताना, नृत्य करताना आणि उत्साहात सहभागी होताना दिसत आहेत.
कंगना रनौत यांनी हा आपला पहिला तीज उत्सव असल्याचं सांगितलं. रेखा गुप्ता यांच्या घरी तीज साजरी करताना आपल्याला अगदी घरच्यासारखं आणि आपुलकीचं वातावरण जाणवलं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंगना यांनी रेखा गुप्ता यांचे प्रेम, आपुलकी आणि पाहुणचाराबद्दल आभार मानले. त्यांनी रेखा गुप्ता यांचा उल्लेख ‘रेखा दीदी’ असा करत, त्यांच्याकडून मोठ्या बहिणीसारखं प्रेम आणि लाड मिळाल्याचं सांगितलं.
कंगना यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझा पहिला तीज सण, रेखा दीदींच्या घरी. खरंच मोठ्या बहिणीचं प्रेम आणि लाड, अगदी घरासारखा आपलेपणा. सर्वांना तीजच्या अनेक शुभेच्छा.’
कंगना यांचा पारंपरिक लूक
तीज सेलिब्रेशनसाठी कंगना रनौत यांनी पारंपरिक लूक केला होता. हिरव्या आणि नारंगी रंगाची सिल्क साडी त्यांनी नेसली होती. त्यावर कॉन्ट्रास्टिंग हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.
गल्यात चोकर नेकलेस, त्याला मॅचिंग कानातले आणि हातात बांगड्या असा दागिन्यांचा साज त्यांनी केला होता. पारंपरिक वेशभूषेतील कंगना यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या सेलिब्रेशनमध्ये त्यांनी मेहंदी लावून घेतली आणि इतर महिलांसोबत नृत्याचाही आनंद घेतला.
अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय
कंगना रनौत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. सध्या त्या मंडीच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. राजकारणात प्रवेश केल्यानंतर कंगना यांनी हिमाचल प्रदेशातील पायाभूत सुविधा, आपत्ती निवारण आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित मुद्द्यांवरही भूमिका मांडली आहे.