Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा

Kangana Ranaut: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी लग्नाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. तुम्ही अभिनेत्याशी लग्न करणार की राजकारण्याशी असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2026 | 11:20 AM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कंगना यांनी त्यांच्या लग्नाबाबत आणि पूर्वीच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. कायदेशीर प्रकरणं आणि पोलिसांच्या कारवायांमुळे त्यांचं एक नातं लग्नापर्यंत पुढे जाऊ शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर एकदा होणाऱ्या सासू-सासऱ्यांसमोरच समन्स आल्याने ते घरातून निघून गेल्याचाही किस्सा त्यांनी सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एका जोडीदाराची गरज असते, असं मत त्यांनी मांडलं. “माझ्या आईवडिलांचं नातं पाहून मलाही संसार आणि मुलांचं महत्त्व जाणवतं. त्यामुळे लग्नाबाबत माझ्या मनात सकारात्मक विचार आहेत”, असं त्या पुढे म्हणाल्या.

मात्र कंगना यांच्या आयुष्यातील काही परिस्थितींमुळे लग्नाची योजना अनेकदा पुढे सरकू शकली नाही. विशेषत: त्यांच्यावर सुरू असलेल्या विविध कायदेशीर प्रकरणांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कंगना यांनी सांगितलं की, जेव्हा तिचं एखाद्या व्यक्तीसोबत नातं जुळण्यास सुरुवात व्हायची, त्याच काळात तिच्या आयुष्यात कायदेशीर अडचणी निर्माण व्हायच्या. कधी पोलिस घरावर यायचे, तर कधी समन्स यायचे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबावरही या परिस्थितीचा परिणाम व्हायचा.

लग्नाची बोलणी सुरू असतानाच आले समन्स

तुम्ही एखाद्या अभिनेत्याशी लग्न कराल की राजकारण्याशी, असा प्रश्न विचारताच कंगना हसत म्हणाल्या, “याबद्दल मी काय सांगू? लग्नाबद्दल माझे विचार खूपच सकारात्मक आहेत. लग्न करू नये किंवा तुम्ही इतक्या पॉवरफुल झालात की आता लग्नच करू नये, असं मला अजिबात वाटत नाही. प्रत्येकाला जोडीदाराची गरज असते, असा माझा विश्वास आहे. माझ्या आईवडिलांचं नातं ज्याप्रकारे आहे, ते पाहता मला वाटतं की मलाही मुलं असावीत. पण माझ्यावर अनेक कोर्ट केसेस आहेत. जेव्हा कधी कोणासोबत गोष्टी जुळायला लागतात, तेव्हा पोलीस माझ्या घरी येतात. ते मला तरी घेऊन जातात किंवा समन्स तरी पाठवतात. एकदा माझे होणारे सासू-सासरे माझ्या घरी आले होते आणि तेव्हाच नेमके मला समन्स मिळाले होते. ते पाहून ते पळून गेले. त्यामुळे हा सुद्धा एक दुष्परिणाम आहे.”

कंगना यांनी याआधीही विविध मुलाखतींमध्ये लग्नाबाबत मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चा आणि माध्यमांचं लक्ष यामुळेही नातेसंबंधांवर परिणाम झाल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us