Tukaram Mundhe : भल्याभल्यांना धडकी भरवणाऱ्या तुकाराम मुंढेंना कशाची भीती वाटते? पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
तुकाराम मुंढे हे त्यांच्या धाडसी कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी अन्नभेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांना धडकी भरवणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्याला नेमकी कशाची भीती वाटते, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला.

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कार्यभाग हातात घेतल्यापासून अन्नपदार्थ विकणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. नुसतं तुकाराम मुंढेंचं नाव ऐकताच अनेकांची बोबडी वळताना दिसत आहे. पण भल्याभल्यांना कापरे भरवणारे तुकाराम मुंढे यांना कुणाची भीती वाटते? सरकारची? कुटुंबाची? की आणखी कुणाची? पिंपरीचिंचवड येथील एका मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी त्यांना कुणाची भीती वाटते याचा खुलासा केला आहे. दिशा सोशल फाउंडेशनने घेतलेल्या कार्यक्रमात मुंढे यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना हा खुलासा केला आहे.
बेधडकपणे तुम्ही कारवाई करता, तुम्हाला कुणाची भीती वाटत नाही का? तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते? असा सवाल तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला मुंढे यांनी थेट उत्तर दिलं. भीती एकतर मृत्यूची वाटते. आता मरण कधी ना कधी येणार आहेच. मला स्वतःच्या प्रतिमेची कधी भीती वाटली नाही. म्हणजे कशाची भीती वाटत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. प्रशासनात सबुरीने काढा तुम्ही म्हणता, तसंच घरी पण सबुरीने घ्यावं लागतं, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं.
राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या का?
मी पब्लिक सर्व्हन्ट आहे, त्यामुळं आजच्या दिवसाचा विचार करतोय. त्यामुळं निवृत्तीनंतरचं पाहू. आता मी काम करतोय, करू द्या, असं एका प्रश्नाचं उत्तर देताना मुंढे म्हणाले. तुम्ही राजकारणात जाण्याचा विचार केला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मुळात मी आयएएस होईल असं मला वाटत नव्हतं. त्यामुळं पुढं काय होईल, निवृत्तीनंतर काय करेन हे आताच सांगता येत नाही. किंवा ठरवलं ही नाही. माझ्या इतकं स्पष्ट कोणी आहे किंवा नसेल याबाबत मला माहीत नाही. माझं स्पष्टपणे ठरलेलं आहे, असं ते म्हणाले. तुम्हाला राजकीय पक्षांकडून ऑफर आल्यात का? असा सवाल केला असता, मी पब्लिक सर्व्हन्ट आहे. आता मी सर्वचं गोष्ट सांगू शकतो का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
तो चिकित्सकपणा आपल्यात नाही
खाद्यपदार्थांवर कारवाई करण्याच्या धडाक्याबद्दलही त्यांनी स्पष्ट साांगितलं. झोपलेल्या व्यक्तीला जागं करता येत, पण झोपल्याचं सोंग केलेल्या व्यक्तीला जागं करता येत नाही. आता आपण कुठं आहोत हे आधी पाहायला हवं. त्यामुळं मला हा विभाग मिळाला तेव्हा मी माहिती घेतली अन् लक्षात आलं की आरोग्य धोक्यात आहे. जे खातोय ते आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहेत. आपण खूप चिकित्सक आहोत, ज्ञान घेण्यातही आपल्याला बराच रस असतो. कारण आपण तेवढे वैचारिक आहोतच. पण अन्न पदार्थाच्या बाबतीत तो चिकित्सकपणा आपल्यात नाही, हे दुर्दैव आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे…
प्रत्येकवेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे शहाणपणाचं नसतं. प्रवाहाच्या विरोधात कधी आणि कुठं वाहायचं हे शहाणपणाचं असतं. रिऍलिटी स्वीकारली जात नाहीये, समोरचा काही बोलला की लगेचं राग येतोय. नैतिकता पाळायला हवी. आपण विचारवंत आहोत, पण अलीकडे वैचारिक भेसळ होतेय का? याचा विचार करायला हवं. हल्ली फॉरवर्ड करण्याची प्रथा पडलीये. मग अशावेळी भेसळ होते, असंही ते सोशल मीडियाच्या अनुषंगाने बोलताना म्हणाले.
गरिबी म्हणजे परिस्थिती…
गरिबी म्हणजे परिस्थिती म्हणता येईल. मग ती आर्थिक, समाजातील, नोकरीतील अशा कोणत्याही प्रकारची ती गरिबी असू शकते. आता अशा परिस्थितीत तुमचं कॅरॅक्टर ठरतं. तुम्ही गरीब आहात, म्हणून कोणी दिलेले पैसे घेतले, हे जस्टीफाय होत नाही. असं केलं तर तुम्हाला तात्पुरते यश मिळू शकतं. अशी तुम्ही तडजोड केली तर यश मिळत नाही, याचा शेवट ही तडजोडीत मोडतो, असंही त्यांनी सांगितलं.
म्हणजे काय बदललं पाहिजे?
तुम्हाला कार्यशैलीत बदल करण्यास सांगितलं जात आहे, असं विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. कार्यशैलीत बदल करा, म्हणजे कोणत्या दोन गोष्टी बदलायला हव्या हे सांगा. मुळात नियम हे माध्यम आहे. नियम का असतो? त्या नियमाप्रमाणे केलं तर सगळं ठीक आहे. कारण त्यातच पब्लिक इंटरेस्ट आहे. मग म्हणतात की हा नियम पाळत नाही, तिथं पब्लिक इंटरेस्ट नसतो, असं त्यांनी सांगितलं.
सर्वचं अधिकारी काम करतात, फक्त सर्वांच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे मीच खूप चांगलं काम करतोय, असं मी कधीचं म्हणत नाही. मुळात तुम्ही काम करता, यापेक्षा मी काम का करत नाही? असा प्रश्न विचारला की सर्व उत्तरं मिळतात. त्यामुळं मी कधी कोणाची कोणाशी तुलना करत नाही. माझ्या आधी कोण होतं? त्याने काय केलं? त्यांच्या त्रुटी मी काढत बसत नाही. मला पुढं काय करायचं आहे, हाचं माझा विचार असतो. जे निर्णय घेतोय, त्यांचा अपेक्षित रिझल्ट येतोय का? नागरिकांचा त्यातून फायदा होतोय का? याचा विचार मी करतो, असंही त्यांनी सांगितलं.
