नहीं बताऊंगी.. म्हणत जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईकच ढकलला; Video पाहून कंगना स्पष्टच बोलल्या..

मंगळवारी इंडिया ब्लॉकच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केलं. यावेळी जया बच्चनसुद्धा मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनादरम्यानचा जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नहीं बताऊंगी.. म्हणत जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईकच ढकलला; Video पाहून कंगना स्पष्टच बोलल्या..
Kangana Ranaut and Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 10:04 AM

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन एका रिपोर्टरचा माइक हाताने बाजूला करताना दिसत आहेत. या घटनेवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनीही जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं व्हिडीओमध्ये काय दिसतं?

दिल्लीमध्ये 6 ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी हा मोर्चा आयोजित केला होता. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह जया बच्चनही सहभागी झाल्या होत्या. याच आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला. काही पत्रकार जया बच्चन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. एका रिपोर्टरने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता जया बच्चन यांनी त्याच्या हातातील माइक मागे ढकलला. त्यानंतर त्या पुढे निघून गेल्या. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने शेअर होऊ लागला.

Loading...

कंगना राणौत यांची पोस्ट

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कंगना राणौत यांनीही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यावर टोला लगावला. कंगना यांनी उपरोधिक अंदाजात जया बच्चन यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण जगासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी आंदोलनात बसायचं, मात्र पत्रकाराने ‘तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?’ असं विचारल्यावर उत्तर न देण्याची भूमिका कशी, असा सवाल कंगना यांनी केला.

याच आंदोलनादरम्यान जया बच्चन यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना “गणेशजी चुकीच्या कामात मदत करत नाहीत”, असं म्हटलं आहे. तसंच, “जोपर्यंत माझे पाय साथ देतील, तोपर्यंत मी चालत राहीन,” असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे माइक हटवणाऱ्या व्हिडीओसोबतच त्यांची आंदोलनातील वक्तव्येही चर्चेचा विषय ठरली आहेत.

कंगना आणि जया बच्चन यांच्यात याआधीही अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे कंगना यांची ही नवी प्रतिक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, या आंदोलनामागे SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या Special Intensive Revision प्रक्रियेचा मुद्दा आहे. विरोधकांचा आरोप आहे की, मतदार याद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं प्रभावित झाली असून या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us