
‘कांतारा’ आणि ‘कांतारा: चाप्टर 1’ या दोन्ही चित्रपटांनी कन्नड चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. देशभरात ‘कांतारा’ची चर्चा झाली. परंतु आता काही महिन्यांनंतर ‘कांतारा: चाप्टर 1’मधील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यामागचं कारण म्हणजे ‘बेंगळुरू टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषभ शेट्टीने चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रुक्मिणी वसंत आणि राज बी. शेट्टी यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. इतकंच नव्हे ऋषभ ‘होम्बाले फिल्म्स’च्या अकाऊंटलाही फॉलो करत नसल्याचं समजल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. होम्बाले फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत ऋषभने ‘कांतारा’च्या दोन्ही भागांची निर्मिती केली होती. त्यामुळे यांच्यात नेमकं काय बिनसलंय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
यात आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे होम्बाले फिल्म्सचे प्रमुख विजय किरागंदूर यांना मात्र ऋषभ फॉलो करतोय. रुक्मिणी, राज आणि ऋषभ यांच्यात काही मतभेद आहेत की हे केवळ सहजच अनफॉलो करण्यापर्यंत मर्यादित आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. याविषयी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.
2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्याच्या तीन वर्षांनंतर ‘कांतारा : चाप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने भारतात 740 आणि जगभरात 850 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. होम्बाले फिल्म्स बॅनरअंतर्गत बनलेल्या या चित्रपटात ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत यांच्यासोबत जयराम आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल असून 2 ऑक्टोबर 2025 रोजी तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा सध्या कन्नडमधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला होता. रुक्मिणी वसंतने यामध्ये देवी कनकवतीची भूमिका साकारली होती.