
प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने पुन्हा एकदा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मला नि:संशयपणे हा चित्रपट खूप आवडला आहे आणि त्यात दाखवलेल्या राजकारणामुळे मी अजिबात नाराज झालो नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात कंदहार विमान अपहरण, 2001 मधील संसदेवरील हल्ला आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांच्या कारवायांवर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं आहे. ‘धुरंधर’ने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावरही तेवढीच चर्चा सुरू आहे. एकीकडे ‘धुरंधर’चं कौतुक होत असताना हा चित्रपट प्रचारकी आणि पाकिस्तानविरोधी असल्याचीही टीका त्यावर होत आहे.
‘युवा संघटना इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ने (IIMUN) आयोजित केलेल्या संवाद सत्रादरम्यान, करण जोहरला ‘धुरंधर’ आणि राजकीय छटा असलेल्या चित्रपटांबद्दल त्याचे काय विचार आहेत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना करण म्हणाला, “मला नि:संशयपणे आणि पूर्णपणे धुरंधर हा चित्रपट आवडला आहे. 3 तास 34 मिनिटं विस्मयाने हा चित्रपट पाहत होतो. कारण मला दिग्दर्शकाची कला प्रचंड आवडली आहे. त्यातील कथाकथन आवडलंय आणि ज्या प्रकारे ते दोन भागांमध्ये विभागलं गेलं तेसुद्धा आवडलं आहे. माझ्या मते या चित्रपटाचा दृष्टिकोन हा अधिक अंतर्गत होता आणि तो कशाचाही विरोधात नव्हता. या चित्रपटात राजकारणाबद्दल एका वेगळ्या पद्धतीने बोललं गेलं आहे.”
यावेळी करण जोहरला हृतिक रोशनच्या मताबद्दलही प्रश्न विचारण्यात आलं असता त्याने त्याच्या मताशी सहमत नसल्याचं सांगितलं. ‘धुरंधर’मधील कोणत्याही वैचारिक मुद्द्यावर मी नाराज नसल्याचं करणने इथे स्पष्ट केलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “मला चित्रपटात दाखवलेल्या राजकारणाबद्दल खरंतर वाईट वाटलं नाही. ते कोणत्या दिशेने दाखवलं जात आहे हे मला माहित आहे. त्याबद्दल काही लोक सहमत किंवा असहमत असू शकतात. त्यामुळे हृतिकने जे म्हटलंय, त्याच्या मताचा मी पूर्ण आदर करतो. त्याला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु मला चित्रपटातील कोणत्याही वैचारिक मुद्द्याबद्दल वाईट वाटलं नाही. मी तो चित्रपट कलाकृतीसाठी आणि त्यातील विविध पैलूंसाठी पाहिला आणि मला तो खूप आवडला. मला असं वाटतं की आदित्य धरचा आवाज वेगळा आहे आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीत एक मजबूत आवाज म्हणून उदयास येतोय.”