Kareena Kapoor: शाहिदच्या घरी येणार तिसरं बाळ? करीना कपूरच्या प्रश्नावर मीरा राजपूतने दिलं असं उत्तर
Kareena Kapoor: अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही नुकतीच करीना कपूरच्या चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती. या शोमध्ये दोघींमध्ये बऱ्याच गप्पासुद्धा रंगल्या. करीनाने यावेळी मीराला त्यांच्या तिसऱ्या बाळाविषयी प्रश्न विचारला.

Kareena Kapoor: अभिनेत्री करीना कपूर खान आणि शाहिद कपूर हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, ही गोष्ट जगजाहीर आहे. या दोघांचं नातं आणि त्यांचा ब्रेकअप चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत होता. ब्रेकअपनंतरही जेव्हा शाहिद आणि करीना एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांच्यातील संकोचलेपणा जाहीरपणे दिसला होता. मात्र भविष्यात करीना आणि शाहिदची पत्नी मीरा राजपूत एकत्र एका चॅट शोमध्ये दिसतील, याची कल्पना मात्र कोणीच केली नसेल. मात्र प्रत्यक्षात असं घडलं आहे. ‘व्हॉट वुमेन वाँट’ या शोमध्ये दोघी त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने गप्पा मारताना दिसल्या. या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे करीना मीराला त्यांच्या तिसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगविषयी गंमतीने विचारताना दिसत आहे. करीना कपूरच्या या लोकप्रिय चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या मीराने तिसऱ्या बाळाबाबतच्या अफवांवर मिश्किल अंदाजात उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून करीना कपूरलाही हसू अनावर झालं.
करीना कपूर खानच्या ‘What Women Want’ या चॅट शोच्या सहाव्या सीझनमध्ये मीरा राजपूत पाहुणी म्हणून सहभागी झाली आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून त्यामध्ये दोघींमध्ये रंगलेली गप्पांची मैफल पाहायला मिळते. यावेळी करीना मीराला तिच्याबद्दल ऐकलेली सर्वात विचित्र अफवा कोणती, असा प्रश्न विचारते. यावर मीराने शाहिद आणि तिच्या तिसऱ्या बाळाबाबतच्या चर्चेचा उल्लेख केला. तिच्या आणि शाहिदच्या आयुष्यात आणखी एका बाळाचं आगमन होणार असल्याची अफवा तिने ऐकली होती. यावर करीना मजेशीरपणे ‘असं होऊ शकतं’ असं म्हणते. मात्र, मीराने लगेचच या शक्यतेला नकार दिला. ‘अजिबात नाही, आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने उत्तर दिलं.
पहा व्हिडीओ-
या गप्पांदरम्यान मीराने करीनाचं कौतुक करत तिला बॉलिवूड स्टार म्हटलं. त्यावर करीनाने विनोदी अंदाजात स्वतःला ‘वॉनाबी बॉलिवूड वाइफ’ असं म्हटलं. दोघींमधील हा संवाद प्रोमोमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या सहज आणि मोकळ्या गप्पांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शोमध्ये दोघींनी वैवाहिक आयुष्याबद्दलही चर्चा केली. नवरे अनेकदा पत्नीला काहीतरी घेऊन देण्याचं आश्वासन देतात, पण ते पूर्ण होत नाही, अशा विषयावर मीराने एक मजेशीर उपाय सांगितला. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची यादी तयार करावी, असा तिचा सल्ला होता. करीनालाही ही कल्पना आवडली. याशिवाय, महिलांसोबत वाद झाल्यास पुरुषांनी काय करावं, असं विचारल्यावर मीराने ‘माघार घ्यावी, वाद घालू नये’ असं मिश्किल उत्तर दिलं.
करीना कपूर आणि शाहिद कपूर एकेकाळी बॉलिवूडमधील चर्चेतील जोडी होती. दोघांनी 2004 ते 2007 या काळात एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर करीना 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत विवाहबंधनात अडकली, तर शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. करीना आणि सैफ यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहिद आणि मीराला मीशा आणि झैन ही दोन मुलं आहेत.