सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब, ‘दागिने समोरच ठेवले पण…’
Saif Ali Khan: 'दागिने समोरच ठेवले पण...', हल्लेखोर करीना - सैफ यांच्या घरी नक्की कोणत्या उद्देशाने आला होता? करीनाच्या जबाबानंतर धक्कादायक माहिती समोर..., याप्रकरणी पोलीस करत आहेत कसून चौकशी...

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्लानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सेलिब्रिटींवर सतत होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस देखील याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. अनेकांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री आणि सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवला आहे. करीनाने घडलेली घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
करीना कपूर हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्लेखोर घरात आला. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. हल्लेखोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही संपूर्ण खान कुटुंब 12 व्या मजल्यावर पोहोचलो…’ हल्लेखोराने 11 व्या मजल्यावर हल्ला केला.
पुढे अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ‘घरात दागिने समोरच ठेवलेले होते. पण हल्लेखोराने दागिन्यांना हात देखील लावला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली. अशात आरोपी चोरीच्या उद्देशाने आला होता का? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पण त्याने दागिन्यांना हात देखील लावला नाही म्हणून हल्लेखोर चोरीच्या उद्देशाना आला नसावा असं स्पष्ट दिसून येत आहे.




रात्री 2.30 वाजेनंतर जे काही झालं ते करीनाने सविस्तर पोलिसांना सांगितलं आहे. करीना कपूरच्या जबाबानंतर त्या अनुशंगाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घटनेनंतर करीना धक्क्यात असून तिची बहीण करिष्मा तिला सोबत खार येथील घरी घेऊन गेल्याची पोलीस सूत्रांची माहिती दिली आहे.
ऑटोचालक भजनसिंग राणा याची देखील झाली चौकशी
सैफ अली खानला सुखरूप रुग्णालयात नेणारा ऑटोचालक भजनसिंग राणा याला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. भजनसिंग राणा यांनी ‘टीव्ही 9’ शी खास बातचीत करताना सांगितलं की, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलं आहे. शुक्रवार पासून मला पोलिसांचे फोन येत होते आणि आज मला सकाळी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं.
भजनसिंग राणा म्हणाले की, पोलिसांना सैफ अली खानशी संबंधित काही प्रश्न विचारायचे आहेत. सैफ अली खानच्या घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत ते भजनसिंग राणाकडून संपूर्ण माहिती पोलिस घेणार आहेत.