करिश्मा कपूरच्या पूर्व पतीचं पार्थिव अद्याप अंत्यसंस्कारविनाच; काय आहेत अडचणी?
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं लंडनमध्ये 12 जून रोजी निधन झालं होतं. पोलो खेळताना त्याने चुकून मधमाशी गिळली होती. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास अडचण जाणवून हृदयविकाराचा झटका आला. संजय 53 वर्षांचा होता.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं लंडनमध्ये अकस्मात निधन झालं. पोलो खेळताना संजयने चुकून मधमाशी गिळल्याचं म्हटलं गेलंय. मधमाशीने घशात डंख मारल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समोर आली. 12 जून रोजी संजयचं निधन झालं. परंतु निधनाच्या सात दिवसांनंतरही त्याच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार झाले नाहीत. संजयचं पार्थिव नवी दिल्लीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यात कायदेशीर बाबींमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे लंडनहून भारतात पार्थिव आणण्यासाठी इतके दिवस लागले. अखेर निधनाच्या सात दिवसांनंतर आज (19 जून) संजयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याचं कळतंय.
संजयच्या कुटुंबीयांनी अंत्यविधीविषयी माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीच्या लोधी रोड स्मशान घाटात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील. संजयचं निधन लंडनमध्ये झालं होतं. त्याच्या अमेरिकन नागरिकत्वाशी संबंधित कायदेशीर औपचारिकतेमुळे पार्थिव भारतात आणण्याच्या प्रक्रियेला उशिर झाला. त्याचं पार्थिव भारतात आणण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे आणि अधिकृत निवेदनं आवश्यक असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.
22 जून रोजी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये संध्याकाळी 4 ते 5 वाजतादरम्यान संजयच्या प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी संजय कपूरच्या कुटुंबीयानी त्याच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराची माहिती देणारी एक प्रेस नोट जारी केली. त्यात अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण याची माहिती देण्यात आली. दरम्यान प्रार्थना सभेच्या निवेदनावर संजयची आई राणी सुरिंदर कपूर, पत्नी प्रिया सचदेव, मुलं सफिरा, अझायरिस यांच्या नावांचा उल्लेख आहे. त्याचसोबत त्यावर पूर्व पत्नी करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान यांचीही नावं आहेत.
करिश्मा आणि संजयने 2003 मध्ये लग्न केलं होतं. तर लग्नाच्या 11 वर्षांनंतर ते विभक्त झाले. 2016 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. या दोघांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने मॉडेल प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. या दोघांना सफिरा आणि अझायरिस ही दोन मुलं आहेत.
