
Sunjay Kapur Property : अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन संजय कपूरच्या सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या उत्तराधिकाराचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात पारदर्शकता राखली जावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. संजय कपूर यांची मुलं म्हणजे समायरा (20 वर्षे) आणि किआन (15 वर्षे) यांच्या वतीने त्यांची आई करिश्मा कपूर न्यायालयात हजर झाली आहे. करिश्माने संजय कपूर यांच्या इच्छापत्राबाबत माहिती लपवण्याचा आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप केला आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर तब्बल सात आठवड्यांनी हे इच्छापत्र समोर आलं आहे. याआधी कुठलंही इच्छापत्र नसल्याचं करिश्माला सांगण्यात आलं होतं.
करिश्मा कपूरच्या मुलांचे वकील आणि वरिष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केलं की, हा खटला ट्रस्टमधून मिळणाऱ्या फायद्यांबाबत नाही, तर संजय कपूरच्या वैयक्तिक संपत्तीतील वारसा हक्क मिळवून मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे. “हा खटला संजय कपूर यांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि भारतात आणि परदेशात असलेल्या संपत्तींवर त्यांचा न्याय्य हक्क सुनिश्चित करण्यासाठी लढण्यात येत आहे,” असं जेठमलानी म्हणाले.
मार्च 2025 च्या एका इच्छापत्रामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या इच्छापत्रानुसार संजय कपूरची सर्व वैयक्तिक संपत्ती त्याची तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवला देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हे इच्छापत्र नोंदणीकृत नाही आणि त्याचं इच्छापत्रप्रमाणही घेण्यात आलेलं नाही. कपूर यांच्या मुलांनी विचारणा केली असता त्यास नकार देण्यात आला. हे वादग्रस्त इच्छापत्र तसंच 12 जून 2025 रोजी संजय कपूर यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची संपूर्ण यादी उघड करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रिया सचदेव कपूरच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात दावा केला की, संजय कपूरच्या मुलांना आर. के. कुटुंबाच्या ट्रस्टमार्फत आधीच 1,900 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम सोना कॉमस्टार या कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित आहे आणि हे शेअर्स अद्यापही ट्रस्टकडेच ठेवण्यात आले असून, ती रक्कम प्रत्यक्षात मुलांना मिळालेली नाही. ट्रस्टमधील या संपत्तीचं नियंत्रण प्रिया सचदेव कपूरकडे आहे आणि मुलांना या रकमेचा अॅक्सेस नाही.
याचा संदर्भ स्पष्ट करताना महेश जेठमलानी म्हणाले, “समजा एकूण संपत्ती 30,000 कोटी रुपये आहे आणि त्यातून मुलांना आर. के. ट्रस्टकडून 1,900 कोटी मिळाल्याचा दावा केला आहे. असं असलं तरीही उर्वरित 28,000 कोटींहून अधिक रक्कम प्रिया सचदेव कपूर यांच्या वाट्याला येतं. या प्रचंड संपत्तीतील मोठा हिस्सा त्या सहज सोडून देतील का? या खटल्यामागचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. क्लास 1 वारसांमध्ये येणाऱ्या पाचही व्यक्तींना, म्हणजेच करिश्मा आणि संजय कपूर यांच्या दोन मुलांना, संपत्तीचा अॅक्सेस मिळावा यासाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे.”