या लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे ‘केबीसी’च्या पहिल्या सिझनच्या विजेत्याची पत्नी

'कौन बनेगा करोडपती' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता तुम्हाला आठवतोय का? हर्षवर्धन नवाथे यांनी पहिल्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यांची पत्नी ही लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे.

या लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे केबीसीच्या पहिल्या सिझनच्या विजेत्याची पत्नी
हर्षवर्धन नवाथे आणि सारिका नवाथे
Image Credit source: Instagram
| Updated on: May 10, 2026 | 2:28 PM

‘कौन बनेगा करोडपती’ या शोने अनेकांचे स्वप्न पूर्ण केले आहेत. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याच्या संधीमुळे अनेकांचं नशीब रातोरात पलटलं. 2000 मध्ये केबीसीचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज 26 वर्षांनंतरही या शोचे अनेक सिझन्स यशस्वीरित्या चालू आहेत. पण केबीसीच्या पहिल्या सिझनचा विजेता तुम्हाला आठवतोय का? हर्षवर्धन नवाथे यांनी पहिल्या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकले होते. या शोनंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. हर्षवर्धन यांच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचित लोकांना माहीत आहे. त्यांनी एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न केलं. ही अभिनेत्री सध्या ‘कमळी’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत आहे. सारिका नवाथे असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारिक तिच्या पतीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “केबीसीची लोकप्रियता संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे अनेकजण आजही मला केबीसीच्या पहिल्या विजेत्याची बायको म्हणूनच ओळखतात. कधी कधी असं वाटतं की, त्या पलीकडेही माझी वेगळी ओळख आहे. कारण मीसुद्धा विविध मालिकांमध्ये बरंच काम केलं आहे. पण हर्षवर्धन यांचा निश्चितच मला अभिमान आहे”, असं सारिका ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हर्षवर्धन नवाथे यांचे वडील आयपीएस अधिकारी होते आणि ते स्वत: केबीसीमध्ये येण्याआधी सिव्हिल सर्व्हिससाठी तयारी करत होते. त्यावेळी ते मुंबईत राहत होते. आज त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. केबीसी जिंकल्यानंतर मिळालेल्या रकमेतून काय केलं, हे सांगताना ते ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मला मिळालेल्या पैशांतून मी चांगली गुंतवणूक केली. माझ्या पुढील अभ्यासावर काही पैसा खर्च केला. अभ्यासासाठी मी परदेशीही गेलो. मला मॉडेलिंग आणि अभिनयाचेही ऑफर्स मिळाले. त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं.”

हर्षवर्धन यांना आयएएस अधिकारी बनायचं होतं. मात्र ते स्वप्न अधुरंच राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आयुष्य तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेते आणि त्याबदल्यात काही गोष्टी देतेसुद्धा. केबीसीचा अनुभव माझ्यासाठी असाच होता. त्या शोनंतर मला पैसा, प्रसिद्धी बरंच काही मिळालं. पण माझं आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं”, असं ते म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us