KGF मधील ‘खसीम चाचा’ कॅन्सरशी देतोय झुंज; सूज लपवण्यासाठी शूटिंगदरम्यान वाढवली होती दाढी

| Updated on: Aug 27, 2022 | 9:38 AM

"सर्जरीसाठी चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील लोकांनी पैशांची मदत करावी यासाठी मी व्हिडीओदेखील शूट केला होता. मात्र सोशल मीडियावर तो व्हिडीओ पोस्ट करण्याची हिंमत मी करू शकलो नाही", अशी खंत हरीशने व्यक्त केली.

KGF मधील खसीम चाचा कॅन्सरशी देतोय झुंज; सूज लपवण्यासाठी शूटिंगदरम्यान वाढवली होती दाढी
KGF मधील 'खसीम चाचा' कॅन्सरशी देतोय झुंज
Image Credit source: Instagram
Follow us on

‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF 2) या चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता हरीश राय (Harish Rai) याने घशाच्या कर्करोगाशी (throat cancer) झुंज देत असल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. केजीएफ 2 ची शूटिंग सुरू असतानाही त्याला कर्करोग होता आणि त्यादरम्यान सूज लपवण्यासाठी दाढी वाढवल्याचंही त्याने सांगितलं. हरीश कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. केजीएफ 2 मध्ये त्याने खसिम चाचा ही भूमिका साकारली होती. केजीएफ 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. जवळपास 1200 कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला. कन्नड चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. हरीशने केजीएफ: चाप्टर 1 मध्येही भूमिका साकारली होती. पहिला भाग 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

युट्यूबर गोपी गोवद्रुला दिलेल्या मुलाखतीत हरीश त्याच्या आजारपणाविषयी म्हणाला, “परिस्थिती तुमच्यावर मेहरबान होऊन संधींचा वर्षाव करू शकते किंवा मग तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेऊ शकते. तुमच्या नशिबात जे लिहिलंय, त्यापासून तुम्ही धावू शकत नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी कॅन्सरशी लढा देतोय. केजीएफमध्ये मोठी दाढी ठेवण्यामागचं हेच कारण होतं. माझ्या घशाजवळील सूज मला लपवायची होती.”

सुरुवातीला पुरेसे पैसे नसल्याने कॅन्सरची सर्जरी पुढे ढकलल्याचं त्याने सांगितलं आणि आता त्यामुळे तब्येत आणखी खराब होत आहे. “माझ्याकडे आधी काहीच पैसे नव्हते म्हणून मी सर्जरी पुढे ढकलली. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी वाट पाहिली. आता कॅन्सरची चौथी स्टेज असल्याने माझी तब्येत आणखी बिघडतेय. सर्जरीसाठी चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील लोकांनी पैशांची मदत करावी यासाठी मी व्हिडीओदेखील शूट केला होता. मात्र सोशल मीडियावर तो व्हिडीओ पोस्ट करण्याची हिंमत मी करू शकलो नाही”, अशी खंत हरीशने व्यक्त केली. केजीएफ चाप्टर 1 आणि 2 शिवाय हरीशने बँगलोर अंडरवर्ल्ड, धन धना धन आणि नन्ना कनासिया हुवे या चित्रपटांमध्येही काम केलंय. गेल्या 25 वर्षांपासून तो कन्नड चित्रपटसृष्टीत काम करतोय.

हे सुद्धा वाचा