
अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं होतं. दाऊद दहशतवादी नाही, बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही कटात त्याचं नाव कधीच समोर आलं नाही, असं ममताने म्हटलंय. तिच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता तिने यू-टर्न घेतला आहे. मी दाऊदबद्दल नाही तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते, असं ममताने स्पष्ट केलंय. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं ममता म्हणाली. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत ममता म्हणतेय, “काल माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. मला सर्वांत आधी प्रश्न विचारण्यात आला की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तुझं नाव जोडलंय का? त्यावर मी म्हणाले की, हे चुकीचं आहे. मी दाऊदला कधीच भेटले नाही किंवा मी त्याला ओळखतही नाही. त्यामुळे मला हा प्रश्न विचारलाच पाहिजे नव्हता. त्यानंतर मी पुढे म्हणाले की, ज्याच्यासोबत माझं नाव जोडलं होतं.. विकी गोस्वामी.. त्याच्याशीही मी नातं तोडलं आहे. त्यानेसुद्धा कधीच देशविरोधी कारवाया केल्या नाहीत. तुम्ही कधी ऐकलंय का की विकी गोस्वामीने बॉम्बस्फोट घडवून आणला? देशविरोधी कारवाया करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीशी माझा कधीही संबंध नव्हता, यापुढेही नसेल. मी कट्टर हिंदुवादी आहे. म्हणूनच मी भगवे वस्त्र धारण केले आहेत.”
“दाऊद इब्राहिम माझ्यासाठी एक दहशतवादी आहे. त्याच्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. विकी गोस्वामीचे त्याच्याशी काय संबंध आहेत, मला माहीत नाही. मला अंडरवर्ल्ड कारवायांबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मी गेल्या 25 वर्षांपासून ध्यानसाधना आणि तप करतेय. या गोष्टीची जर कोणाला खिल्ली उडवायची असेल तर उडवू द्या. माझ्याकडे विद्या आणि ज्ञान आहे. मला देवी महाकालीचा आशीर्वाद मिळाला आहे. यातून मी सनातन धर्मात पुढे जातेय. या धर्माचा मी प्रचार करत राहीन”, असं ममताने पुढे स्पष्ट केलं.
2017 मध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या दोघांचं नाव समोर आलं होतं आणि त्याआधारे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. जानेवारीमध्ये गोस्वामी, इब्राहिम आणि बकताश आकाशा तसंच गुलाम हुसैन यांना केन्यातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. या सर्वांना नोव्हेंबर 2014 मध्ये युएस ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीच्या (DEA) स्टिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आली होती.